डॉ. रामराव महाराजांचे होते मोठे योगदान- अशोक चव्हाण

प्रमोद चौधरी
Saturday, 31 October 2020

एकंदरीतच बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची शेवटपर्यंत आग्रहाची भूमिका होती, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

नांदेड ः वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरु डाॅ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी (ता.30) रात्री मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. एकंदरीतच बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची शेवटपर्यंत आग्रहाची भूमिका होती, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

श्री. चव्हाण म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात डॉ. रामराव महाराज यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रुढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरण केले आहे. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. डॉ. रामराव महाराज यांचे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून चव्हाण कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे.

हेही वाचा परभणी : महापालिकेची सहा रुग्णालये नॉन कोविड रुग्णासाठी परत सुरु

रामराव महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी

खासदार प्रताप पाटील चिखलीकर ः  बंजारा समाजाचे धर्मगुरु थोर तपस्वी संत प.पु.रामराव महाराज (बापु) संस्थान पोहरादेवी यांचे शुक्रवारी (ता.३०) रात्री मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे बंजारा समाजाची मोठी हानी झाली. अध्यात्म त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन या माध्यमातून वाडी - तांड्यासह बंजारा, भटक्या जाती समुहात भटक्या समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर रामराव महाराजांनी अतुलनिय कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य दिर्घकाळ समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांच्या प्रकृतिची स्वतः दिल्लीस्थित येथे जावून विचारपुस केली होती. त्यांचे आशिर्वाद घेतले. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील भाग्याचा होता. महाराजांच्या सहवासात अनेकदा मला राहता आले. सेवेची संधी उपलब्ध झाली. मी स्वतःला धन्य मानतो. महाराजांच्या निधनाचे वृत्त कळताच मोठा धक्का बसला. महाराजांचे विचार समाजासाठी चिरंतर प्रेरणादायी ठरणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ramrao Maharaj had a great contribution Ashok Chavan nanded news