
बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यावे असे आवाहन करत बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा असा संदेश जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी नांदेडकरांना दिला आहे.
नांदेड : सध्या जिल्ह्यात विशेष करुन कोरोनाच्या काळात बालविवाहाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. वाढत्या घटना ह्या समाजासाठी भूषणावह नाहीत. मुला- मुलींचे लहान वयात लग्न करणे म्हणजे येणारी भावी पीढी कमजोर व अशक्त बनविणे होय. असे प्रकार घडू नये व होणारे बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यावे असे आवाहन करत बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा असा संदेश जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी नांदेडकरांना दिला आहे.
बाल विवाह प्रतिंबध अधिनियम- २००६ सुधारीत ता. १३ जूलै २०१६ मधील कलम १० व ११ अन्वये बाल विवाह विधीपूर्वक लावण्याहबद्दल चालना किंवा परवानगी देणाऱ्यास शिक्षा विहीत करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सर्व नागरिक, माता- पिता, पालक, प्रसार माध्यम, पुरोहीत (सर्व धर्मीय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटर्स, मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक तसेच सर्व व्यावसायीक यांना वेळोवेळी कळविण्यात येत असते. त्यासाठी जिल्हा महिला बाल विकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईन काम करत असते.
दोन वर्ष सक्त मजुरी व एक लाखाचा दंड अशी शिक्षा
बाल विवाहास चालना देणारी कोणतीही कृती करतील किंवा तो विधीपूर्वक लावण्यास परवानगी देईल किंवा तो विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यास हलगर्जीपणाने कसुर करतील, यामध्ये बालविवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो. ती व्यक्ती दोन वर्षापर्यंत असु शकेल इतक्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लक्ष रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस देखील पात्र आहे.
बालविवाह कायद्याच्या तरतुदीचा भंग केल्यास संबंधीत व्यक्ती वरिल शिक्षेस पात्र
वरील विवाहाशी संबंधीत सर्व नागरिक, व्यावसायीक व संस्था यांनी विवाह अथवा विवाहसंबंधीत कामकाज करतांना, विवाह करणाऱ्या व्यक्ती हे कायद्यानुसार सज्ञान ( मुलाचे वय- २१ व मुलीचे वय- १८ वर्ष) असल्याची खातरजमा करुनच विवाह संबंधीत कामे करावीत. शिवाय त्या संबंधीची माहिती दर्शनी भागावर डकवावी. बालविवाह कायद्याच्या तरतुदीचा भंग केल्यास संबंधीत व्यक्ती वरिल शिक्षेस पात्र राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी केले आहे.