Video - निराधारांना जगण्यासाठी हवाय मदतीचा आधार...

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 22 मे 2020

गेल्या दीड दोन महिन्यापासून कोणी ना कोणी मदतीसाठी पुढाकार घेत होता. त्यामुळे गोरगरिब, गरजूंना त्याचा आधार होता. धान्याच्या किटमुळे तसेच अन्नदानामुळे अनेकांची भूक भागवली जात होती. पण आता अनेकांनी मदतीचा हात आखडता घेतला आहे.

नांदेड - कोरोनामुळे देशभरात दोन महिन्यापासून लॉकडाउन सुरु असून कधी संपेल सांगता येत नाही. सुरवातीला प्रशासनासह काही स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर नागरिकांनी पुढे येत गरजू, गोरगरिब आणि निराधारांना मदत केली. काहीजण आताही करत आहेत. पण आता अनेकांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे निराधारांना जगणे अवघड झाले आहे. अशा काळात निराधारांना मदत करण्याची त्यांना आधार देण्याची गरज आहे.

नांदेड शहरात कोरोनाचा फैलाव पहिल्या लॉकडाउनच्या काळात झाला नाही. मात्र, दुसऱ्या टप्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. आता चौथा लॉकडाउन सुरु असून शुक्रवारी (ता. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत ११६ रुग्ण सापडले असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ जणांवर उपचार सुरु असून ४१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा - ‘ध’ चा ‘मा’ झाल्यामुळे नांदेडकर बुचकळ्यात, जबाबदारी कोणाची?

गरजूंना केली अनेकांनी मदत
कोरोनाच्या महामारीत लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला नाही. त्यामुळे अशा मजूर, कामगार तसेच निराधार, गोरगरिब आणि गरजूंना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी मदत केली. त्यामध्ये मुख्य सचखंड गुरुद्वारा, गुरुद्वारा लंगरसाहिब, दिलीप ठाकूर यांचा लॉयन्सचा डबा, भाजपचे कम्युनिटी किचन, कॉँग्रेस, भाजप आणि शिवसेनातर्फे जीवनावश्‍यक वस्तूंचे किट, जिल्हा परिषद, महापालिकेतर्फे अन्नदान, पिंकू पोकर्णा यांच्यातर्फे अन्नदान, पोलिस विभागासह इतरांकडून सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप, रेल्वे विभाग, साईप्रसाद तसेच हॅप्पी क्लबतर्फे अन्नदान तसेच किटचे वाटप करण्यात आले. दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेत किराणा सामान गरजूंना दिले. 

मदतीचा हात आखडता 
गेल्या दीड दोन महिन्यापासून कोणी ना कोणी मदतीसाठी पुढाकार घेत होता. त्यामुळे गोरगरिब, गरजूंना त्याचा आधार होता. धान्याच्या किटमुळे तसेच अन्नदानामुळे अनेकांची भूक भागवली जात होती. पण आता अनेकांनी मदतीचा हात आखडता घेतला आहे. त्याचबरोबर गुरुद्वाराचा लंगरही (प्रसाद) बंद झाला आहे. त्यामुळे निराधारांना आता अन्नधान्य किंवा धान्याच्या किट मिळणे बंद झाले आहे. शासनाच्या मार्फत रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळत असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे चणचण भासू लागली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - लॉकडाउन, तरीही बँकेला 6 कोटी 90 लाखाचा निव्वळ नफा

निराधारांना आता हवाय मदतीचा आधार
नांदेड शहरातील रस्त्याच्या कडेला तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि परिसरात काही ठिकाणी निराधार बसलेले दिसून येत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी किंवा पोलिस व इतर दानशूर व्यक्ती मदत करताना दिसत आहेत. काही वेळेला मदत मिळते तर काही वेळेला उपाशीपोटी रहावे लागत आहे. त्यामुळे अशा गरजूंना आता मदतीचा आधार हवा आहे. त्यासाठी आता पुन्हा एकदा त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. 

बेघर निवारा केंद्रातही मदत
महापालिकेच्या वतीने गोकुळनगर भागात शहर बेघर निवारा केंद्र आहे. त्या ठिकाणी सध्या वीस जण राहत आहेत. त्यांना राहण्याची तसेच जेवणाची व चहा नाष्टाची सोय करण्यात आली आहे. या आधी त्या ठिकाणी जवळपास ७० जणांना ठेवण्यात आले होते. शहरात निराधार म्हणून फिरणाऱ्यांना अशा मदत केंद्रात महापालिकेने पाठविण्याची गरज व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts should be made to support the destitute now, Nanded news