नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक चुरशीची होणार

file photo
file photo

नांदेड - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरली असून समर्थ सहकार पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढवणाऱ्या आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील बिनविरोध निवडून आले आहे. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन दिग्गज नेत्यांनी जिल्हा बॅंक आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी ताकद पणाला लावली आहे. आता ही निवडणुक अतीतटीची होणार असल्याचे चिन्ह आहे. 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या ता. दोन एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी (ता. २३) शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी ही सरळ लढत होत आहे. आघाडीचे हदगाव येथील उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व भोकरचे उमेदवार आणि विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

समर्थ सहकार पॅनेलमध्ये हे उमेदवार
महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनेलमध्ये नायगावमधून माजी आमदार वसंतराव चव्हाण, मुखेडमधून हणमंत पाटील बेटमोगरेकर, मुदखेडमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, उमरीमधून संदीप मारोतराव कवळे, किनवटमधून दिनकर दहिफळे, अर्धापूरमधून बाबूराव कदम कोंडेकर, लोह्यामधून ललिताबाई सूर्यवंशी, कंधारमधून माधवराव पांडागळे, देगलूरमधून विजयसिंह देशमुख यांना तर महिलासाठी राखीव असलेल्या नांदेड तालुक्यातून संगीता पावडे तर हिमायतनगरमधून विजयाबाई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातून ज्या पाच जागा लढण्यात येणार आहेत. त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, इतर सहकारी संस्थांमधून बँकेचे माजी चेअरमन मोहनराव पाटील टाकळीकर, नागरी सहकारी बँक व पतसंस्थामधून शिवराम लुटे, भटक्या जाती - जमाती व विशेष मागासप्रवर्गातून व्यंकटराव जाळणे, अनुसूचित जाती - जमाती राखीव मतदारसंघातून सविता मुसळे यांना संधी देण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये तिन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन सर्व घटकांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धर्माबाद व माहूर या ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निर्णय राज्यपातळीवरील नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे.

१८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. २३) तब्बल ६० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण २१ जागा असून त्यापैकी तीन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. आता १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन दिग्गज नेत्यांनी जिल्हा बॅंक आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी ताकद पणाला लावली आहे. आता ही निवडणुक अतीतटीची होणार असल्याचे चिन्ह आहे. 

ज्येष्ठ नेते खतगावकर यांची बिनविरोध निवड 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे नेते माजी खासदार खतगावकर यांनी बिलोली तालुका विविध सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बँकेचे संचालक म्हणून ते सध्या कार्यरत असून त्यांनी अध्यक्षपदही भुषविलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव मिळून देण्यासाठी खतगावकर यांनी मागील काळात प्रयत्न करुन ही बँक नावारुपास आणण्याचा प्रयत्न केला. खतगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com