नांदेड : सिंकदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला सुरुवात

प्रमोद चौधरी
Friday, 15 January 2021

पहिल्या टप्प्यात मेडचेल ते मुदखेड लोहमार्गाच्या विद्युतीकरण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात मुदखेड ते मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण होईल.

नांदेड : सिंकदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला मंजूरी मिळाली असुन येत्या दोन वर्षात या मार्गावरील सर्व रेल्वे विजेवर धावणार आहेत. त्यामुळे सिकंदराबाद - मनमाड मार्गावरील प्रवास अधिक जलद होणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

त्यात म्हटले की, सिंकदराबाद ते मनमाड या रेल्वे मार्गावरील रेल्वे सध्या डिझेलवर धावतात. मनमाड येथून पुढे धावणा-या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आल्याने त्या भागातील रेल्वे प्रवास अधिक सुकर होतो. परंतु सिंकदराबाद ते मनमाड या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरुच झाले नव्हते. शिवाय या मार्गाच्या दुहेरी करणाचे काम जलद गतीने होत आहे. 

हेही वाचा - सावधान : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आॅपरेशन सुरु

खासदार म्हणून मी निवडून आल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सदर मागणी केली होती. त्याला १५ जून २०१९ रोजी मंजूरीही मिळाली. याच काळात नांदेड ते बिदर या नवीन रेल्वे मार्गालाही मंजूरी देवून पिंक बुकमध्ये तरतुद करण्यात आली. मात्र, सिंकदराबाद ते मनमाड रेल्वे लोहमार्गाच्या विद्युतीकरणच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच देशात कोरोनाचा प्रार्दूरभाव वाढल्याने टाळेबंदी करण्यात आली होती. टाळेबंदी उठल्यानंतर सिकंदराबाद ते नांदेड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी २२ डिसेंबर रोजी संबंधीत प्रशासनाला पत्र पाठवून काम जलद गतीने सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे, प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

हे देखील वाचाच - दस लाख रुपये दो, नही तो ठोक देंगे; नांदेडच्या बार मालकाला मागितली खंडणी, तिघांना पोलिस कोठडी
 
विद्युतीकरण दोन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सिंकदराबाद ते मनमाड लोहमार्गाच्या विद्युतीकरणासाठी आवश्यक असणारा निधी महापारेषणकडे वर्ग केला आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.  मेडचेल ते मुदखेड आणि मुदखेड ते मनमाड अशा दोन विभागात आणि दोन टप्यात लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सिकंदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पुर्ण होण्याची अपेक्षाही खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electrification Of Secunderabad To Manmad Railway Line Started Nanded Railway News