इंग्रजी माध्यमांच्या शाळा आल्या अडचणीत

प्रमोद चौधरी
Friday, 23 October 2020

कोरोनासारखे संकट आपल्यावर येणार, अशी पुसटशी कल्पना जरी असती, तरी पाल्याला इंग्रजी शाळेत टाकले नसते, अशा भावना पालक व्यक्त करत आहेत.  

नांदेड : कोरोना आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रालाच बसला आहे. परंतु, त्यातल्या त्यात छोट्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना याची झळ प्रचंड प्रमाणावर बसली आहे.

गत सहा महिन्यांपासून कोरोना आजारामुळे जीवनशैलीच बदलून गेली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम नागरिकांच्या उत्पन्नावर झाला. सुरुवातीला लाॅकडाउन आणि त्यानंतर अनलॉक जरी झाले असले तरी उत्पन्नाचे स्त्रोत पाहिजे तसे वाढलेले नाहीत. काही सरकारी कर्मचारी, व्यापारी वर्ग सोडला तर खासगी नोकरी तसेच मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यात अजुनही पैसे खेळताना दिसत नाहीत. कोरोनासारखे संकट आपल्यावर येणार, अशी पुसटशी कल्पना जरी असती, तरी पाल्याला इंग्रजी शाळेत टाकले नसते, अशा भावना पालक व्यक्त करत आहेत.  

हेही वाचा - नांदेड- ९३ टक्के कोरोनाबाधितांना दिलासा, गुरुवारी २३३ कोरोनामुक्त; ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

इतरांप्रमाणेच आपला मुलगा शिकावा म्हणून जेमतेम उत्पन्न असलेल्या अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकले. विशेष म्हणजे कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या पालकांसाठी इंग्रजी माध्यमाच्या लहान संस्था फायदेशीर ठरल्या. डोनेशन द्यायचे काम नाही. केवळ वार्षिक फी घेवून अशा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविल्या जाते. अनेक शाळा अशा आहेत की त्यांचा खर्च वसूल होणाऱ्या फीच्या रक्कमेपेक्षा जास्त आहे.

हे देखील वाचाच - हिंगोली : वीज चोरी करणाऱ्या २७५ आकडेबहाद्दरांवर कारवाई

त्यामुळे इतरवेळी जिथे पैशांची जुळवाजुळव करावी लागते, तिथे कोरोनामुळे तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकांचेही उत्पन्न थांबले असल्याने त्यांच्याकडून फी जमा करणे अशक्य आहे. काही संस्थांची गतवर्षीची फीसुद्धा वसूल होवू शकली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावे? असा प्रश्न संस्थाचालकांना भेडसावत आहे. शिवाय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे प्रत्यक्षात शाळा बंद असल्यातरी संस्थांकडून विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. साधारणपणे एक आॅगस्टपासून सर्वच शाळांकडून असा प्रयोग सुरु आहे. परंतु, आर्थिक आवक थांबल्याने या संस्था प्रचंड आर्थिक संकटात सापडल्या आहेत. परिणामी शाळा डबघाईस आल्या असून, शासनाने अशा संस्थांना आर्थिक मदत देण्याची मागणी संस्थाचालक तसेच शिक्षकही करत आहेत.  

येथे क्लिक कराच - नांदेड : तीन महिन्यानंतर पेनूर खूनप्रकरणी गुन्हा दाखल

पालकांसाठी सुवर्णमध्य
जे पालक आपल्या पाल्यांना भरमसाठ फी व डोनेशनमुळे मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी छोट्या संस्था सुवर्णमध्य ठरताना दिसत आहेत. डोनेशन द्यायची गरज नाही, शिवाय फच्या रकमेत शिक्षण मिळत असल्याने पालकांचे पाल्याला इंग्रजी शाळेत टाकण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. 

कौटुंबिक अडचणी वाढल्या
यावर्षी कोरोना आजारामुळे सर्वांचेच अर्थचक्र पार बदलून गेले आहे. साहजिकच विद्यार्थ्यांच्या पालकांकडेही पैसे नाहीत. त्यामुळे फीची रक्कम थकल्याने इंग्रजी शाळांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाच महिन्यांपासून पगार नसल्याने कौटुंबिक अडचणी वाढल्या आहेत.
- सुलोचना वामनराव कुलकर्णी (शिक्षिका)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: English Medium Schools Are In Trouble Nanded News