
जिल्ह्यात १७ भरारी पथकाची स्थापना
नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात खरीप नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक आणि तालुका स्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, रेल्वे डीसीएम जय पाटील, पोलीस उप अधिक्षक डॉ. आश्विनी जगताप, कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेट्टे, महाबीज, एमएआयडीसी, जिल्हा पणन अधिकारी आदी संबंधित कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते व संभाव्य अडचणी, नियोजन यांचे सादरीकरण कृषि विकास अधिकारी चिमणशेट्टे यांनी केले.
खरीप हंगामासाठी सात लाख ५६ हजार दोनशे हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी प्रस्तावित असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र चार लाख ४० हजार हेक्टर सोयाबीन पिकाखाली प्रस्तावित आहे. घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे खरीप अपेक्षित सोयाबिन पेरणीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. सोयाबीन क्षेत्रासाठी एक लाख १५ हजार क्विंटल बियाणे मागणी नोंदविलेली आहे. यानुसार सोयाबीन बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यास सर्व खताची मिळून दोन लाख ११ हजार ११० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर आहे. युरिया खताचे ६६ हजार १६० मेट्रिक टन, डीएपी खताचे ३८ हजार ९८० मेट्रिक टन, एम.ओ.पी. खताचे १८ हजार ३९० मेट्रिक टन, एस.एस.पी. खताचे २५ हजार ६५० मेट्रिक टन, एन. पी. के. एस. खताचे ६१ हजार ९३० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यास युरिया चार हजार ३५० मेट्रिक टन व डीएपी तीन हजार ५९० मेट्रिक टन बफर स्टॉक खरीप हंगामासाठी नोडल एजन्सी म्हणून एम. ए. आय.डी आहे. जिल्ह्यास बफर स्टॉकसाठी नेमणूक केलेल्या नोडल मार्कफेड व एमए आयडीसी एजन्सीच्या साठवणूक गोडाऊनला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Web Title: Establishment Of 17 Bharari Squad In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..