esakal | नांदेडमध्ये खळबळ : वनविभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे शिवदास ढवळेंचे आत्मदहन; वनविभागाच्या जमिनीवरच झाला कोळसा

बोलून बातमी शोधा

माळाकोळी आत्मदहन
नांदेडमध्ये खळबळ : वनविभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे शिवदास ढवळेंचे आत्मदहन; वनविभागाच्या जमिनीवरच झाला कोळसा
sakal_logo
By
एकनाथ तिडके

माळाकोळी (जिल्हा नांदेड) : येथून जवळच असलेल्या चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे (वय 52) यांनी वन विभागातील झालेल्या बंधाऱ्यांच्या बोगस कामाची चौकशी केली जावी, हरीण व मोरांच्या हत्येची चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांच्या संदर्भात ता. 28 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन ता. 16 मार्च रोजी दिले होते. मात्र गाफील यंत्रणणेने निवेदनाची दखल घेतली नाही. ठरल्यानुसार त्यांनी बुधवारी (ता. 28) एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता चोंडी जवळील वनविभागाच्या जमिनीत जाळून घेऊन आत्मदहन केले आहे. या खळबळजणक घटनेनंतर माळाकोळी पोलिस ठाण्यात मयताचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी गर्दी करुन शिवदास ढवळे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

चोंडी परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी मनरेगातुन मातीनाला बांधकाम करण्यात आले होते. यावेळी चार हरीण व 10 मोरांची हत्या झाली होती. या संदर्भाने सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींना पाठीशी घालत कार्यवाही केली नाही असे सांगत शिवदास ढवळे यांनी वेळोवेळी निवेदन देत कार्यवाही करण्याची विनंती केली. शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा देवून ता. 28 एप्रिल रोजी वनविभागाच्या सर्व्ह्ये नंबर 64, 132, 133 या ठिकाणी असलेल्या मातीनाला बांध येथे पहाटे साडेपाच वाजता अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्मदहन केले आहे.

हेही वाचा - व्यापाऱ्याची दादागिरी : पोलिसाची लाठी हिसकावून केली शिवीगाळ; जिंतूर येथील प्रकार

यावेळी माळाकोळी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. माळाकोळी पोलिस ठाण्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी भेट देऊन नातेवाईकांशी चर्चा केली व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गतीने करत आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली. यावेळी शिवदास ढवळे यांच्या नातेवाईकांनी वनविभागाचे अधिकारी व इतर आरोपी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माळाकोळी पोलिस ठाणे येथे आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान, नगरसेवक पंचशील कांबळे, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, नगरसेवक बालाजी किल्लारी यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन शिवदास ढवळे यांच्या मृत्यू प्रकरणाचा योग्य तपास करुन संबंधितावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलताना राहुल प्रधान म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुःखदायक असून संबंधित घटनेत दोषी असलेल्या सर्वच आरोपी व यंत्रणा यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या संदर्भाने आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे संबंधित घटना घडली असल्याचे ते म्हणाले त्यामुळे संबंधित पोलिसांवर सुद्धा कार्यवाही होणे गरजेचे आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे