मोबाईलच्या काळात टेलिफोनचे अस्तित्व धोक्यात

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

टेलिफोनची रिंग कानावर पडणे आता दुर्मीळ झाल्याने येणाऱ्या पिढीला फक्त टेलिफोनचे चित्र दाखवावे लागणार की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नांदेड : सध्याच्या युगात चलभाष यंत्र, सोशल माध्यम आणि संपर्कासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीपासून सेवा देत असलेला टेलिफोन मात्र बाजूला पडला आहे. त्याचे अस्तित्व फ्कत शासकिय किंवा स्थानिक संस्था कार्यालयापुरताच मर्यादीत झाला आहे. टेलिफोनची रिंग कानावर पडणे आता दुर्मीळ झाल्याने येणाऱ्या पिढीला फक्त टेलिफोनचे चित्र दाखवावे लागणार की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या लँडलाईन यंत्रणेला मोबाईलमुळे उतरती कळा आली आहे. लँडलाईन केवळ शासकीय कार्यालय, संस्था पुरतेच मर्यादित राहिले आहे. जिल्ह्यात आजमितीस काही बोटावर मोजण्या इतके दूरध्वनी कनेक्शन शिल्लक आहेत. संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जात असले तरी या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. काही वर्षांपूर्वी लँडलाईन वापरणे प्रतिष्ठेचे समजले जात होते. अलिकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे लँडलाईनचे अस्तित्व केवळ शासकीय व संस्थेच्या कार्यालयापुरते आहे.

हेही वाचा -  सुनेला ठार मारुन वेशांतर करुन राहिला, मात्र पोलिसांच्या...

दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य 

शासकीय कार्यालयामध्ये तसेच ज्या व्यक्ती व संस्थेला ब्रॉडब्रँड इंटरनेटची गरज आहे, अशा व्यक्ती व संस्थेला लँडलाईनचा टेलिफोन क्रमांकासाठी केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनी सेवा आढळून येते. घरांमधून मात्र दूरध्वनी सेवा जवळपास गायब झाली असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) तसेच खाजगी कंपन्यांनी ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करून दिली. दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य झाले. मोबाईलमुळे संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येत असल्याने मोबाईल सेवा देण्यात अनेक खाजगी कंपन्या उतरल्या. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाईल सेवा उपलब्ध होत आहे.

लँडलाईन फोन काही दिवसात कालबाह्य 

मोबाईल सेवेचा थेट परिणाम टेलिफोन सेवेवर पडला आहे. परिणामी नागरिकांनी दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे दूरध्वनी सेवा होती त्यांनी सुद्धा ती सेवा बंद केली आहे. एकेकाळी बीएसएनएल लॅंडलाइन तसेच सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. जिल्ह्यात हजारो लँडलाईन कनेक्शन होते. ते आता केवळ बोटावर मोजण्याइतके राहिले आहेत. शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये हा दूरध्वनी संच पहावयास मिळत असल्याने लँडलाईन फोन काही दिवसात कालबाह्य होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The existence of the telephone in the age of mobile is in danger nanded news