esakal | शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू, पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडली घटना, प्रेत तेलंगणा हद्दीत सापडले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

काल सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने या भागातील नदी, नाले, विहिरी, तलाव ओसंडून वाहत असल्याने पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतातून फेरफटका मारून गावाकडे निघालेल्या एका पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा झरी- माळेगाव (मक्ता) रस्त्यावरील नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू

शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू, पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडली घटना, प्रेत तेलंगणा हद्दीत सापडले

sakal_logo
By
सद्दाम दावणगीरकर

मरखेल (ता. देगलूर जिल्हा नांदेड) : परिसरात सोमवारी(ता. १७) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गत चार- पाच दिवसांपासून या भागात संततधार पाऊस आहे. काल सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने या भागातील नदी, नाले, विहिरी, तलाव ओसंडून वाहत असल्याने पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतातून फेरफटका मारून गावाकडे निघालेल्या एका पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा झरी- माळेगाव (मक्ता) रस्त्यावरील नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १७) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

टाकळी (जहांगीर) येथील शेतकरी रामदास मलगोंडा मनगीरे (वय  ५५) यांची सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील चेंडेगाव (मंडळ जुक्कल) शिवारात शेती आहे. गावापासून जवळपास तीन किलोमीटर असलेल्या या शेताकडे सोमवारी हा शेतकरी फेरफटका मारण्यासाठी गेला होता. दरम्यान शेतातील काम आटोपून सायंकाळी गावाकडे निघाले असताना या भागात मुसळधार पावसाने झरी- माळेगाव (मक्ता) नाल्याला पूर आला होता. हा नाला ओलांडून येत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने हा शेतकरी पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाली. दरम्यान नातेवाईकांनी शोध घेऊनही सदरील शेतकऱ्याचा थांगपत्ता लागत नव्हता.

हेही वाचा -  आंतरजिल्हा बदल्या पोकळ बिंदुवर कराव्यात- पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

झुडपात अडकलेल्या स्थितीत आढळून आले

या शेतकऱ्याचे पुरात वाहून गेलेले प्रेत सीमावर्ती भागातील चेंडेगाव (मंडळ जुक्कल, तेलंगणा) याठिकाणी झुडपात अडकलेल्या स्थितीत आढळून आले आहे. दरम्यान या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी चेंडेगाव गाठून सदरील प्रेत हे रामदास मनगीरे यांचेच असल्याची खात्री केली आहे. तेलंगणातील जुक्कल पोलीस व मरखेल ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, मरखेलचे बीट जमादार प्रकाश कुंभारे यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली आहे. दरम्यान माळेगाव मंडळात आजपर्यंत सरासरीच्या तुलनेत ८५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी माहिती दिली

या परिसरात पावसाच्या पुरामुळे मृत्यू झाल्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी हणेगाव येथील एका शेतमजुराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे टाकळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदरील घटना ही तेलंगणा राज्याच्या हद्दीत घडली असल्याने पुढील सोपस्कार, शवविच्छेदन व सदरील अकाली मृत्यूची नोंद ही संबधित पोलीस करणार असल्याची माहिती मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी दिली.

संपादन -प्रल्हाद कांबळे