इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात एक पाणी पाळीचे नियोजन, शेतक-यांना मिळाला दिलासा

लक्ष्मीकात मुळे
Saturday, 21 November 2020

रब्बीच्या पेरणी व ऊस लागवडीवर परिणाम होत असल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आॅनलाईन बैठकीत निर्णय घेवून एक पाणी पाळीचे नियोजन करण्यात आल्यामुळे शेतक-यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्धापूर (नांदेड) : इसापूर धरणाच्या एका पाणी पाळीचे नियोजन झाले असून शुक्रवारी रब्बीच्या पिकांना पाणी देण्यात येणार आहे. या बाबतचे जाहीर प्रगटन पाटबंधारे विभागाने काढले आहे. तर रब्बी व उन्हाळी पिकांसाठीचे पाणी पाळी नियोजन अद्यापही झाले नाही. रब्बीच्या पेरणी व ऊस लागवडीवर परिणाम होत असल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आॅनलाईन बैठकीत निर्णय घेवून एक पाणी पाळीचे नियोजन करण्यात आल्यामुळे शेतक-यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी पाळी नियोजनबाबत दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रकाशीत झाल्यावर चार दिवसात पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेवून निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी 'सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. तसेच धरणे १०० टक्के भरलेली असताना पाणी पाळी नियोजनाबाबत उशीर का होत आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करित आहेत.

हे ही वाचा : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर होऊन प्रगती साधावी

यंदाच्या परतीच्या पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. खरिपाच्या हंगामात अवेळी पावसाचा फटका मूग, सोयाबीन, उडीद, कापूस आदी पिकांना बसल्याने लागवडी खर्च ही निघाला नाही. शेतक-यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. धरणे भरल्याने शेतकरी रब्बीच्या आशेवर आहेत. पण पाणी धरणात १०० टक्के पण नियोजन शून्य टक्के असल्यामुळे रब्बीच्या पेरण्या आणि ऊस लागवडीवर त्याचा परिणाम होत होता. तसेच समाज माध्यमातून प्रश्नांवर संताप व्यक्त केला जात होता. या शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रकाशित झाले, याची दखल प्रशासनाने घेतली.

पाणी पाळी नियोजन बाबत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात धरणातील आढावा घेऊन वेळापत्रक ठरविण्यात येते. युतीच्या काळात ही बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थित होत होती. पण गेल्या वर्षी पालकमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन करण्यात आले होते. पण यंदा नोव्हेंबर अर्धा संपत आला तरी ही बैठक झाली नाही, याबाबत सकाळने प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून शेतक-यांच्या मागणीला वाचा फोडली.

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एल.भालेराव, कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आॅनलाईन बैठक घेवून एका पाणी पाळीचे नियोजन करून शेतक-यांना दिलासा दिला आहे. तसेच येणा-या रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are relieved that a water shift has been planned in the catchment area of ​​isapur dam