हमीभावाने कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक

प्रल्हाद कांबळे
Thursday, 15 October 2020

प्रत्येक तालुक्याची ऑनलाईन गुगल लिंक तयार केली आहे. जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुकानिहाय गुगल लिंकवर येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक नोंदणी करावी, 

नांदेड :- सन 2020-21 मधील हंगामातील कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याची ऑनलाईन गुगल लिंक तयार केली आहे. जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुकानिहाय गुगल लिंकवर येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे.

केंद्र शासनाने हंगाम 2020-21 मध्ये कापसाची किमान आधारभुत किंमत 5 हजार 515 मिडीयम स्टॅम्पल व 5 हजार 825 लॉग स्टॅम्पल अशी जाहिर केली आहे. सन 2020-21 च्या कापूस हंगामाlसाठी कापसाच्या हमी किंमतीत वाढ झाली असल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात एकुण 12.31 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली

जिल्ह्यात हंगाम 2019-20 मधील कापसाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी 8 शासकीय खरेदी केंद्र होते. सन 2019-20 मध्ये भारतीय कापूस निगम सीसीआय व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, खाजगी बाजार, थेटपणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी या सर्वामार्फत जिल्ह्यात एकुण 12.31 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र अशी ऑनलाईन गुगल लिंक तयार करण्यात आली

यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून व सध्या कापूस पिकाची परिस्थितीसुद्धा उत्तम आहे. त्यामुळे हंगाम 2020-21 मधील कापसाचे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. हंगाम 2020-21 मधील कापसाची खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्राथमिक ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र अशी ऑनलाईन गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुक्यातील उपसहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are required to register for purchase of guaranteed cotton nanded news