Video-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी : खासदार प्रताप पाटील चिखलीकर

प्रमोद चौधरी
Tuesday, 29 September 2020

मंगळवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोनखेड आणि शेवडी मंडळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. 

नांदेड :  सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावरील शेतांमध्ये पाणी घुसल्याने हाता-तोंडाशी आलेली पीके जमिनदोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून सरसकट हेक्टर ५० हजार रुपये मदत शासनाने द्यावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

सोनखेड व शेवडी मंडळातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी श्री. चिखलीकर यांनी मंगळवारी (ता.२९) केली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले की, शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहे. यंदाही चांगली पीके बहरलेली असताना सततच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून, त्याला आर्थिक पाठबळ देण्याची गरज असल्याचेही श्री. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा - सोपान शिंदे यांनी तुती लागवडीतून केला शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री. बोरगावकर, तहसीलदार श्री. परळकर, गट विकास अधिकारी श्री. जोंधळे, कृषी अधिकारी सदानंद पोटतेलवार, भाजपचे नांदेड दक्षिण अध्यक्ष सुनील मोरे, बळीराम पाटील जानापुरीकर, डाॅ. पंजाबराव देशमुख, नांदेड दक्षिणचे उपाध्यक्ष खुशाल पाटील बामणीकर, पंचायत समिती उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, माधव सावंत, नानासाहेब मोरे, गणेश मोरे, नागनाथ मोरे, गोविंद  महाराज, रामकिशन वड आदी उपस्थित होते. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला दंडाची शिक्षा

दिग्रस बंधारा, जायकवाडी, सिद्धेश्‍वर, येलदरी तसेच पूर्णा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पातून सातत्याने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये केला जात आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका होत असून, शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कामळज, कौडगाव, चिंचोली, येळी येथील नदीला मिलणाऱ्या नाल्याद्वारे उसावा येऊन पुराचे पाणी उभ्या सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर आदी पिके पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

येथे क्लिक कराच - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस
 
सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने व अतिवृष्टीमुळे नायगा तालुक्यातील हजारो एकर शेतातील मुग, उडीद, सोयाबीन कापूस व ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने रिहावल्या खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Nanded District Should Be Given All Possible Help