शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 28 October 2020

जिल्ह्यातील सद्य परिस्थितीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला याविषयी तडकाफडकी निर्णय घेण्याच्या संदर्भात, बैठकीचे आयोजन केले

नांदेड : जिल्ह्यातील तमाम शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची, जिल्ह्यातील सद्य परिस्थितीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला याविषयी तडकाफडकी निर्णय घेण्याच्या संदर्भात, बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील परिस्थितीची माहिती सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे उंचेगावकर यांनी केले आहे. सदर बैठक रविवार (ता. एक) नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता, संघटनेच्या नवामोंढा येथील कार्यालयात होणार आहे.

सोयाबीनचे पीक काढणीला आले असताना नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. त्या पावसाने अनेक नदी- नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन वाहून गेले. वेचणीला आलेला कापूस वाहून गेला. जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून दाम दुप्पट रोजदारी देऊन सोयाबीन काढले, परंतु आद्रतेच्या गोंडस नावाखाली अडाणी शेतकऱ्यांची व्यापारी मोठ्या प्रमाणात लूट करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव पाडत आहेत. या गंभीर समस्येकडे बघायला कोणत्याही लोकप्रतिनिधीला वेळ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. कापूस पूर्णतः भिजला असून वेचणी करून आणलेल्या कापसाचे काटे सरकारने सुरू केले नसून, शेतकऱ्यांची कापूस विक्री होत नाही. दिवाळीचा सण तोंडावर आला असून ह्या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात व्यापारी लूट करत आहेत.

हेही वाचा -  नांदेड : आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू- प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे -

किमान 70 टक्केच्यावर सोयाबीन नुकसानग्रस्त 

पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किमान 70 टक्केच्यावर सोयाबीन नुकसानग्रस्त झाले आहे. विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचा विमा भरला गेला त्या त्या शेतकऱ्यांना सबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या संदर्भात संबंधित कंपनी आणि शासनाकडे मागणी करण्यात येईल. जिल्ह्यातील ऊस कारखानदारांनी अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या उसाच्या भावाची रक्कम जाहीर न करताच कारखाने गाळपाला सुरुवात करत आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले असून मराठवाडा आणि नांदेड जिल्हा मात्र, ऊस कारखानदार मूग गिळून गप्प बसले आहेत. 

येथे क्लिक करासर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध- उद्धव ठाकरे -

तालुक्यातली माहिती संकलित करून सोबत घेऊन यावी

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनो आणि शेतकरी भावांनो बळीराजा शासनाच्या सुलतानी आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. अशा प्रसंगी शेतकरी संघटना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. संघर्ष केल्याशिवाय शेतकऱ्यालाही काहीच मिळणार नाही. जातीसाठी माती खाणाऱ्या शेतकऱ्यांनो आता हे सगळं सोडून, आपल्या शेतीमालाच्या भावासाठी एकत्रित होणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले असून या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व आपल्या तालुक्यातली माहिती संकलित करून सोबत घेऊन यावी. याच बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अध्यक्ष आणि इतर तालुकानिहाय कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. या बैठकीस माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर, ॲड. धोंडीबा पवार, रामराव पाटील कोंढेकर, व्यंकटराव पा. वडजे, विठ्ठल जाधव, शिवराज पा. थडीसावळीकर, किशन पा. इळेगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' organizations will take to the streets to express their grief nanded news