esakal | Devendra Fadanvis: नजर आणेवारीनुसारच शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis: नजर आणेवारीनुसारच शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी

Devendra Fadanvis: नजर आणेवारीनुसारच शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कापूस आदी खरीपांची पीके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहेत. त्यामुळे आता पंचनामे, सर्वेक्षणाच्या मागे न लागता नजर आणेवारीनुसार शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. कारण, हाताशी आलेली पीके डोळ्यासमोर नाहीसी झाल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे, असे मत विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अतिवृष्ट भागाचा दौऱा करण्यासाठी श्री. फडणवीस शनिवारी (ता.दोन) नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. सर्वप्रथम द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पीक विमा कंपनीवाले नोंदणीसाठी ५०० रुपये मागत आहेत. पीक विमा कंपन्यांवर महाविकास आघाडी सरकारचा वाॅच नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट सहन करावा लागत असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

भाजपच्या काळात तातडीची मदत

भाजपच्या काळामध्ये राज्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना दरवर्षी मदत देत गेलो. विमा भरलेला नसतानाही शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे. विदर्भ व मराठवाड्यात नुकसानीची नजर आणेवारी ही ७० ते ७५ टक्के असतानाही पंचनामे आणि सर्व्हे कशाला हवा, असा प्रश्नही श्री. फडणवीस यांनी उपस्थित केला. एकंदरीतच एनडीआरएफचे निकष डावलून आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. त्यामुळे शासनाने आता कुठलाही भेदभाव न करता तातडीची मदत करावी आणि शेतकऱ्यांचा आक्रोश थांबवावा, एवढीच महाविकास आघाडी सरकारकडून आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

शेलगाव येथे भेट देऊन केली पाहणी

अर्धापूर : अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सरसगट मदत देण्याची गरज आहे. अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. दोन) शेलगाव येथे केली. या वेळी शेतकऱ्यांनी २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिलेल्या मदतीच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील खरिपातील पिकांना व बागायती पिकांसाठी मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व‌‌ शेतकऱ्यांनी केली. या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या ‌व्यथा समजण्यासाठी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे झाडं, कापसाचे बोंडे, ऊस आदिंची भेट विरोधी पक्षनेत्यामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिली.

संकटे ही येतच असतात. त्यावर मात करावयाची असते. कारण जीव हा अनमोल आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये. आम्ही राज्य सरकारकडे तातडीने मदत मिळेल यासाठी पाठपुरावा करत आहोत.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

loading image
go to top