शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी     

प्रल्हाद कांबळे
Sunday, 20 September 2020

पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

नांदेड : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले आहे.  

जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्‍यान काही मंडळात अतिवृष्‍टी झाली असून काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय 29 जून 2020 नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे त्‍या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्‍या आत कळविणे बंधनकारक आहे.

हेही वाचा -  Video - नांदेडला महापौरपदासाठी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदासाठी मसूद खान यांचे अर्ज

विमा कंपनीला तक्रार नोंदवावी.

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपनीस सूचना देण्‍याची पद्धत माहिती नसल्‍यामुळे शेतकरी या नुकसानीची तक्रार विमा कंपनीस करत नाहीत. त्‍यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्‍थीतीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीला तक्रार नोंदवावी.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल

यासाठी शेतकऱ्यांना 18001035490 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल. कंपनीच्‍या ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर तक्रार नोंदवता येईल. क्रॉप इन्शोरन्‍स अॅपद्वारे ही तक्रार नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should report crop loss to the insurance company within 72 hours nanded news