
कर्जदार शेतकऱ्यांनी जानेवारीच्या अखेरपर्यंत आपला कर्जाची 20 टक्के रक्कम भरणा करून कर्जमुक्त व्हावे,
नांदेड - भारतीय स्टेट बॅंकेच्या वतीने शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी ऋण समाधान योजना जाहीर केली आहे, परंतु भारतीय स्टेट बॅंकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नांदेड जिल्ह्यात थोडी दिरंगाई झाल्याने या योजनेचा म्हणावा तसा प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यांपर्यंत झाला नाही. तरी कर्जदार शेतकऱ्यांनी जानेवारीच्या अखेरपर्यंत आपला कर्जाची 20 टक्के रक्कम भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
यासंदर्भात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड येथील क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक शंकर येरावार यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असून येरावार यांनी मूळ कर्जापैकी मुद्दलातली 20 टक्के रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी 31 जानेवारीच्या आत भरणा केल्यास त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यात येईल आणि नव्याने त्या शेतकऱ्यास कर्ज देण्यात येणार असल्याचे येरावार यांनी सांगितले.
हेही वाचा - श्री गुरु गोबिंदसिंघजी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा स्थगित; स्थानिक पातळीवर 'सिक्स ओ साइड' चे आयोजन
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्त होण्यासाठी महत्त्वाची ही संधी असून या संधीचे सोनं करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मूळ कर्जातल्या रकमेचा 20 टक्के कर्ज भरणा करावा आणि नव्याने कर्ज घेऊन आपल्या शेती व्यवसायाला चालना द्यावी.
बॅंकेच्या वतीने हे सांगण्यासाठी कदाचित कर्मचारीवर्ग कमी पडला असेल, मात्र गरज आता शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता, या महिन्याच्या आत आपला कळजाचा 20 टक्के रकमेचा भरणा बॅंकेकडे करावा. तसेच बॅंकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रक काढून करण्यात आले आहे.