शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाणाचा प्राधान्याने वापर करावा- रमेश देशमुख

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाणांचा प्राधान्याने वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे.
सोयाबीन पेरणीसाठी
सोयाबीन पेरणीसाठी

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाणांचा प्राधान्याने वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे.

कंधार तालुक्यात खरीप हंगामात कापूस पीक खालोखाल सोयाबीन या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. गतवर्षी या पिकाची लागवड २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर झालेली होती. या पिकाला असलेली मागणी व बाजारातील भाव पाहता याहीवर्षी या पिकाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता असून साधारणतः 10 ते 15 टक्के क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

गतवर्षी सोयाबीन उगवण न झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. तालुक्यातून सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी उगवण न झालेल्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. या वर्षी सोयाबीनला मिळत असलेले उच्चांकी दर व बियाण्याची उपलब्धता पाहता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

हेही वाचा - गुजरात प्रभारी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना या ठिकाणाहून मुंबई येथील लिलावती हाॅस्पीटलमध्ये गुरुवारी (ता. २९) हलविण्यात येणार.

हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस सरासरी एवढा पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे खरीप हंगाम लाभदायक ठरण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणेच्या ऊगवन बाबतीत तक्रारीचा अनुभव पाहता यावर्षी त्याबाबतीत अधिक जागरुक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबीन बियाणे घरचे असो वा विकतचे या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी उगवण क्षमता चाचणी करने अतिशय गरजेचे असून ही चाचणी अतिशय विश्वासार्ह व उगवणशक्ती बाबत भरवश्याची आहे.

ही तपासणी अतिशय सोपी व लवकर होते. याकरीता एक गोणपाट घेऊन ते पाण्यात भिजवून घ्या. पेरणीसाठी जे स्वच्छ करुन ठेवलेलं बियाणे वापरावयाचे आहे. त्या प्रत्येक बॅग किंवा पोत्यातील थोडे थोडे बियाणे काढून एकत्र करा यातील १०० बियाणे घेऊन गोणपाटावर १० बियाणांची एक ओळ याप्रमाणे १० ओळीत टाका त्यानंतर गोणपाटाची गोल गुंडाळी करुन त्यावर गरजेनुसार ओलावा टिकेल एवढं पाणी शिंपडा दोन दिवसांनंतर गोणपाट उघडून उगवण झालेल्या मोडांची संख्या मोजा ती ७० टक्के किंवा जास्त आढळून आल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरा. जर उगवण ७० टक्के पेक्षा कमी आढळून आली तर कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचेशी संपर्क करुन एकरी पेरणीसाठी अधिकचे बियाणे किती वापरावे याबाबत सल्ला घेऊन पेरणी करावी.

सोयाबीनची पेरणी १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी, ट्रॅक्टरद्वारे खोल नांगरणी व मशागत केलेल्या शेतासह अन्य शेतातही बियाणेची पेरणी ५ सेमी पेक्षा खोल होणार नाही याची दक्षता घ्यावी ,सोयाबीन बियाण्याला बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी जेणेकरून बियाण्याची उगवण चांगली होईल व भविष्यात येणाऱ्या किडीं व रोगांपासून पिकाचे काहीकाळ संरक्षण होईल बियाण्यास बीजप्रक्रिया सोबतच रायझोबियम व ट्रायकोडर्मा जैविक खतांची व जैविक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया जरूर करावी.

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान करुन पेरणीसाठी घरचे बियाणे राखून ठेवण्याबाबत प्रयत्न करण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन साठवून ठेवलेल आहे. सोयाबीन हे स्वपरागीत असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची गरज नाही. घरचं बियाणे पेरणीसाठी वापरता येत व त्याचा उत्पादकतेवरही परिणाम होत नाही. अश्या बियाणाची उगवण क्षमता तपासून हे बियाणे पेरणीसाठी वापरावे.

कृषी विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये बिगरहंगामी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. यापासून एकरी चार ते आठ क्विंटल उत्पादन होत आहे. आता हे पीक काढणीस तयार आहे अनेक गावात काढणीचे काम सुरु आहे. गावातील व परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधून हे बियाणे जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करुन घ्यावे. बिगरहंगामी सोयाबीनची उगवण ही ८६ टक्केच्यावर येत असल्याचे दिसून येत आहे. बियाण्याची उगवण क्षमता चांगली असल्याने हे बियाणे एकरी २२ ते २३ किलो याप्रमाणे पेरले तरी चालते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com