esakal | शेतकऱ्यांना हादरा : बनावट बियाणांसोबत आता हरणांच्या टोळधाडीचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील मरवाळी, मुगाव, खंडगाव, गडगा, कोपरा, रातोळी व वडगाव परिसरात हरणांच्या कळपाने हैदोस घातला असून कोवळी पिके फस्त करत आहेत.

शेतकऱ्यांना हादरा : बनावट बियाणांसोबत आता हरणांच्या टोळधाडीचे संकट

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : बोगस बियाणांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे ओढावलेल्या संकटानंतर आता हरणाच्या टोळधाडीचे नवे संकट उभ टाकले आहे. सरसकट पडलेल्या पावसाने पिके तरारली असतांनाच तालुक्यातील मरवाळी, मुगाव, खंडगाव, गडगा, कोपरा, रातोळी व वडगाव परिसरात हरणांच्या कळपाने हैदोस घातला असून कोवळी पिके फस्त करत आहेत. हरणांच्या टोळधाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने वनविभागाने या हरणांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

कोरोनाचा सर्वत्र उद्रेक वाढल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे अर्थिक बजेट कोलमडले. एकीकडे भितीदायक चिञ असतांनांही दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची कशीबशी तयारी करुन महागाडे बियाणे खरेदी केले. मृग नक्षत्रात पडलेल्या पावसानंतर बळीराजाने कापसाला कमी प्रमाणात ठेवत नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीनकडे लक्ष केंद्रीत केले होते. मात्र अनेक नामांकित कंपण्यानींच बनावट बियाणे बाजारात आणल्याने हजारो शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

हेही वाचा -  मरखेल ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा

हरणाचे कळप धुमाकूळ घालत आहेत

दुबार पेरणीनंतर निर्सगाची साथ चांगली मिळत असून काही ठिकाणी सरसकट तर कुठे अंशतः  पीकापुरते का होईना पाऊस अधून- मधून चालू असल्याने शेतशिवारात पीके चांगलीच डोलत आहेत. सध्या पीक परिस्थिती चांगली असल्याने शेतक-यांसाठी ही समाधानाची बाब असतांनाच काही दिवसापासून हरणांच्या टोळधाडीचे नवीन संकट शेतकऱ्यांना पुढे उभे टाकले आहे. तालुक्यातील मरवाळी, मुगाव, खंडगाव, गडगा, कोपरा, रातोळी व वडगाव, मरवाळी तांडा व धानोरासह अनेक गावातील शेतशेवारात हरणाचे कळप धुमाकूळ घालत आहेत. हरणांच्या या टोळधाडीमुळे  शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. हिरवेगार दिसणारे कोवळे सोयाबीनचे मोड फस्त करत आहेत. त्याचबरोबर पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासाडी करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

हरणांच्या टोळधाडीचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व वन विभागाने दखल घ्यावी

अगोदरच शेतकऱ्यासमोर संकटाची मालिका असतांना हरणांच्या टोळधाडीचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. तसेच या भागात वानरांचीही संख्या प्रचंड वाढली असून वाढलेल्या संख्येचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्योग व्यवसाय देशोधडीला लागले असून गोरगरीबांच्या व मजूरा़च्या हाताला काम मिळेनासे झालेले असतांना हरणाच्या कळपाचा आणि वानरांच्या हैदोसामुळे शेतातील पिके भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. संचारबंदीमुळे नागरिक व शेतकरी घरातच अडकून पडले आहे. तर दुसरीकडे शेतशिवारात हरणांचा व वानरांचा धुमाकूळ हे नविन संकट उभे राहिले आहे. हरणांच्या टोळधाडीचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व वन विभागाने तत्काळ दखल घेऊन योग्य ती पाऊल उचलावे अन्यथा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे