
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात आठ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात सर्वाधीक चार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
नांदेड : पेरणीपूर्व कामे आटोपल्यानंतर शेतकऱ्यांना आता पावसासह पेरणीसाठी लागणाऱ्या पिककर्जाची प्रतिक्षा लागली आहे. मृग नक्षत्रानंतर कधीही पावसाला सुरवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशांच्या व्यवस्थेसाठी बॅंकांसह खासगी सावकाराकडे खेटे मारावे लागत आहे.
प्रशासनाचे नियोजन
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात आठ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात सर्वाधीक चार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खरिपाच्या तयारीबाबत जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. विपीन, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बैठक घेवून शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते तसेच बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी नियोजन केले आहे.
हेही वाचा.....नांदेडमध्ये तलवारीने हल्ला, तिघेजण गंभीर...
लॉकडाउनच्या शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांना यावर्षी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत लागू केलेल्या लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतमाल घरातच राहिल्याने पैशाची अडचणी निर्माण झाली. यानंतर व्यवहार सुरु झाला पण बाजारात मालाची दर घसरले. हमी दरानुसार सुरु असलेले केंद्रावर विक्रीसाठी मर्यादा असल्याने आजही अनेक शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, हभरा व हळद घरामध्ये आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपली आहेत. यामुळे पेरणीच्या काळात लागणाऱ्या पैशाची जोड करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
हेही वाचलेच पाहिजे.....Corona Breaking: ः गुलजारबागमधील ‘ती’ महिला काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू
बियाणे दरवाढीमुळे अडचण
कृषी विभागाकडून पेरणीसाठी लागणाऱ्या खतांसह बियाणांचे नियोजन करुन त्या पद्धतीने पुरवठा केल्यामुळे बाजारात सध्या बियाणे तसेच खते उपलब्ध आहेत. परंतु यंदा महाबीजसह खासगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणांचे दर वाढविल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात एक ता. जूनचा मान्सूनपूर्व पाऊस वगळता त्यानंतर पाऊस झाला नाही. मान्सून सक्रिय झाल्याशिवाय शेतकरी पेरणी करू शकणार नाहीत. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. पेरणीसाठी शेतकरी कर्ज काढून बियाणे आणि खतांची खरेदी केली. यंदा सर्वाधिक कल सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीकडे आहे.
पिककर्ज वाटपाबाबत उदासिनता
शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने बॅंकांना निर्देशीत करुन वेळेत पिककर्ज वाटप करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु यंदा शासनाची कर्जमाफी योजना असल्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कसे कर्ज द्यावे, असा प्रश्न बॅंकापूढे पडला आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंके व्यतिरिक्त इतर बॅंकांनी कर्ज वाटपासाठी अद्याप पुढाकार घेतला नाही. आजपर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना साठ कोटींचे पिककर्ज दिल्याचे माहिती सुत्रांनी दिली.