शेतकऱ्याचं पांढरं सोनं बांधावरच भिजलं

साजिद खान
Saturday, 17 October 2020


मागील आठवडाभरापासून माहूर तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे कापूस सोयाबीन पीक शेत शिवारात ओला होऊन मातीत मिसळला. अधुनमधून रिपरिप बरसणाऱ्या पावसामुळे झाडावर ओला झालेला कापसाची बोंड लोंबकळत आहे. तर पिकल्या बोंडाला सड लागली आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची याचना करत आहे. 
 

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) : मागील आठवडाभरापासून माहूर तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे कापूस सोयाबीन पीक शेत शिवारात ओला होऊन मातीत मिसळला. अधुनमधून रिपरिप बरसणाऱ्या पावसामुळे झाडावर ओला झालेला कापसाची बोंड लोंबकळत आहे. तर पिकल्या बोंडाला सड लागली आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची याचना करत आहे. 

हेही वाचा -   नांदेडला पावसामुळे तीन लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत

कापूस वेचणीच्या हंगामात ढगाळ वातावरणावसह पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे कापूस वेचणी होण्यापूर्वी शेत शिवारातील पिक भिजले. दरम्यान ढगाळ वातावरण कायम असून हवामान खात्याने दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असून पीक काढण्याची लगबग असली तरी मजुरांच्या अडचणीमुळे प्रयत्न फळास येतं की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. शेत शिवारात पांढराशुभ्र पडलेल्या कापूस घरापर्यंत येतच नाही. या विवंचनेत शेतकरी निसर्गाकडून दिलासा मिळण्याची वाट चातकाप्रमाणे पाहत आहे. मात्र दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ होत आहे. त्यात तहसील प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल निरंक पाठवल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर अधिकच मीठ चोळल्या गेले आहे. 

माहूर तालुक्यात नुकसान निरंक
जिल्हाधिकारी नांदेड यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी व नुकसान रक्कमेचे अहवाल तहसील कार्यालयाकडून मागविले होते. यात आश्चर्याची बाब म्हणजे माहूर तालुक्याची नुकसान भरपाई मागणी शून्य नोंदविण्यात आली असून याचा अर्थ की माहूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस सोयाबीन पिकाचे कसल्याच प्रकारचे नुकसान झाले नाही. वास्तविक पाहता तालुक्यातील एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी शिवारातील प्रत्यक्ष बांधावर येऊन पंचनामेच केले नाही. तर हा निरंक अहवाल कशा आधारे बनवला असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या गंभीर प्रकारासंदर्भात तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

जिल्हाधिकारी माहूर तालुक्यातील वायफणी गावास भेट देण्यासाठी आले, त्यावेळी परतीचा पाऊस धो - धो पडत होता. तरी माहुर तालुक्यात पिकाचे नुकसान झाले नाही ही बाब अतिशय गंभीर असून तालुक्यातील मोठे पुढारी याकडे कसे पाहणार आहेत? हे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा प्रशासनासह आपले खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना त्वरीत जाब विचारला पाहिजेत असे मला वाटते. या साठी माहुर तालुका किसान ब्रिगेड शेतकरी हितार्थ लढा देणार आहे.(ता.१९) रोजी तहसील कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे. असे अविनाश टनमने, जिल्हा संघटक किसान ब्रिगेड, माहूर यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Farmer's White Gold Got Wet On The Dam, Nanded News