esakal | मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना

बोलून बातमी शोधा

file photo

वडिलांच्या निधनानंतर आई व मोठ्या बहिणीला दु: ख सहन न झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि नियोजित वेळेवर गावकऱ्यांनी मुलीचा कन्यादान केल.

मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील हरडफ येथील लोककलावंत प्रभाकर बळीराम राठोड वय अंदाजे ६५ वर्ष यांचे आज (ता. पाच) रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आणि होत्याचे नव्हते झाले. कारण आज सोमवारी (ता. पाच ) रोजी त्यांच्या मुलीचा विवाह होता. वडिलांच्या निधनानंतर आई व मोठ्या बहिणीला दु: ख सहन न झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि नियोजित वेळेवर गावकऱ्यांनी मुलीचा कन्यादान केल.

मुलीच्या लग्नाची संपूर्ण तयारी झाली. वऱ्हाड दारावर येऊन ठेपले अन वधूपित्याने सोडले प्राण. हिंदी चित्रपटातील कथानकाला शोभेल अशी ह्रदय हेलावणारी घटना घडली आहे माहूर तालुक्यातील हरडफ येथील. प्रसिद्ध लोककलावंत प्रभाकर बळीराम राठोड (वय ६५) यांच्या मुलीचा सोमवारी विवाह सोहळा वधू मंडपी हरडफ येथे दुपारी बारा वाजता पार पडणार होता. मात्र सोमवारी ता. पाच) पहाटेच्या दोन ते अडीचच्या सुमारास वधूपिता प्रभाकर राठोड यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अवघ्या काही क्षणातच डोळ्यासमोर काळाचा घाला आला आणि थोड्या वेळा पूर्वी हसत- खेळत लग्नाची तयारीत असलेल्या कुटुंबावर आभाळ कोसळले.

हेही वाचाकोरोनाच्या सावटातही नांदेड परिमंडळात ३७ हजार ५२ वीजजोडण्या

प्रभाकर राठोड यांचे निधन झाल्याची बातमी घरात पोहोचत नाही तेवढ्यात त्यांच्या पत्नी व त्यांच्या मोठ्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेचा सदमा पोहचून शुद्ध हरपली या परिस्थितीत हरडफ येथील ग्रामस्थांनी वेळेचाही विलंब न करता प्रभाकर राठोड यांच्या पत्नीला व मुलीला खासगी रुग्णालयातपाठवून दिले. सकाळी प्रभाकर राठोड यांचे अंतिम संस्कार करुन दुपारी मुलीचा विधीवत विवाह लावून कन्यादान केले. मागील अनेक वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आंदोलन उभे करून लढा देणारे प्रभाकर राठोड हे हरहुन्नरी कलावंत ही होते. ते बंजारा भाषेतील गाजलेल्या लोका- इला या चित्रपटाचे निर्माते होते आणि त्यांनी स्वतःआपल्या पत्नीसमवेत या चित्रपटात अभिनय केला होता. औझं आणि पंख या लागू चित्रपटात त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. सार फिल्म प्रोडक्शनचे ते कार्यकारी निर्माते देखील होते.आयुष्य व्यतीत करत असताना आपली प्रत्येक कला लोकांसमोर यावी आणि आपण लोकांचे मनोरंजन करावे असा हेतू बाळगणाऱ्या प्रभाकर राठोड यांचे मृत्यू देखील अखेर चर्चेचा विषय ठरले. मुलगी बोहल्यावर चढण्याआधीच बापाने प्राण सोडल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

मनमिळाऊ, सर्वांना घेऊन चालणारे विशाल हृदयी माणूस, लोका-ईला चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक प्रभाकर राठोड काका यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने अकस्मात निधन झाले आहे. आजच त्यांच्या मुलीचे लग्नही आहे. चित्रपटासाठी आपले आयुष्य जगलेल्या प्रभाकर राठोड यांच्या जाण्याने आमच्यात निर्माण झालेली प्रेमाची पोकळी कधीच भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. त्यांच्या स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली

- मिलिंद कंधारे,
सार फिल्म प्रोडक्शन,वाई बाजार.

अतिशय धक्कादायक घटना माझ्या लोक- इला चित्रपटाचे निर्माते,सार फिल्म प्रोडक्शनचे सदस्य, प्रोडक्शन हेड प्रभाकर राठोड आज आमच्यातून निघून गेले. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे आज त्यांच्या त्या मुलीचं लग्न त्यांच्या च घरी...निशब्द!

- लक्ष्मीकांत मुंडे,
जिल्हा अध्यक्ष,
भाजपा,चित्रपट कामगार आघाडी,नांदेड.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व अखिल भारतीय किसान सभेचे पूर्वाश्रमीचे धडाडीचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रभाकर राठोड यांचा ग्रामीण खेड्या पाड्यापासून ते दिल्लीपर्यंतच्या विविध आंदोलनात सहभाग होता. तळागाळातील लोकांच्या समस्या मांडून ते सोडून घेण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. सतत कार्यमग्न,सामाजिक समस्येची जाण असणारा तारा आज निखळला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड प्रभाकर राठोडला अखेरचा लाल सलाम.

- कॉ. किशोर पवार,कॉ.प्रल्हाद चव्हाण.
अखिल भारतीय किसान सभा,माहूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे