हैवान सासऱ्याला शिक्षा होईल, मात्र ‘त्या’ दोन चिमुकल्यांचे छत्र हरवले त्याचे काय...? 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 27 August 2020

नायगाव तालुक्यातील देगाव येथे चक्क एका सासऱ्याने आपल्या विधवा सुनेचा निर्घृण खून केला. मात्र त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो सध्या कारागृहात आहे. सुनेच्या मृत्यूनंतर तिच्या दोन चिमुकल्यांचा आधार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

नांदेड : सासरा हा आपल्या वडिलापरी असतो अशी समाजात समज आहे. परंतु काही सासरे आजही त्या कसोटीला उतरतात. मात्र काही सासरे हैवानासारखे सुनेसोबत वागतात. सुनेला शारिरीक, मानसिक त्रास देण्याचे प्रकार नित्याचे आहेत. काही घटनांमध्ये तर लैंगीक अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. अशा हैवानरुपी सासरे समाजातील त्यांचे स्थान गमावून बसले आहेत. यावर कहर म्हणजे नायगाव तालुक्यातील देगाव येथे चक्क एका सासऱ्याने आपल्या विधवा सुनेचा निर्घृण खून केला. मात्र त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो सध्या कारागृहात आहे. सुनेच्या मृत्यूनंतर तिच्या दोन चिमुकल्यांचा आधार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

देगाव (ता. नायगाव) येथील किशन विठोबा मोरे हा दारुच्या सवयीचा आहे. तो नेहमी सायंकाळी घरी आल्यानंतर वृद्ध पत्नीला शिविगाळ करुन मारहाण करत असे. त्याच्या भावकितील काही जण वाद मिटविण्यास आले तर त्यंनाच हा शिविगाळ करत असे. त्यामुळे अनेकवेळा त्याचे शेजारी भांडणे झाले की दरवाजे लावून आत बसत. असाच वाद घालून तो आपल्या पत्नीला मारहाण करत होता. सासु मोठमोठ्याने जीवाचा आकांत करत वाचवा, वाचवा म्हणून विव्हळत होती. मात्र नेहमीचेच भांडणे असल्याने कोणी सोडवायला आले नाही. शेवटी मदतीला धावलेल्या विधवा सुनेला तिच्या दोन चिमुरड्या समोरच रक्तबंबाळ करून मरेपर्यंत लाठी- काठीने मारले आणि आपल्याच नातवाच्या डोक्यावरचे मातेचे छत्र हिरावून फरार झाला होता.

हेही वाचापरभणीचे राजकिय वातावरण तापले : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांच्या राजीनाम्यासाठी भाजप युवा मोर्चाची निदर्शने

मिराबाई आपल्या दोन मुलांना घेऊन सासु- सासऱ्यासोबत राहत होती

नायगावपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या देगावमध्ये आपल्या दोन मुलांना घेऊन सासु सासऱ्यासोबत राहत होती. मीराबाई माधव मोरे या विधवा सुनेच्या जीवनात कधी आनंद आलाच नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विवाह करून सासरी म्हणजे घरी आल्यावर काही मोजके दिवस चांगले गेले. त्यानंतर घरात भांडण सुरु झाले. त्याच्या तीन मुलांपैकी एकाचा अपघातात तर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किशन विठोबा मोरे दारू ढोसून आल्यानंतर बायको, सुनांना अमानुषपणे मारहाण करत असे. पत्नी पंचफुलाबाईसोबत ता. २० आॅगस्ट रोजी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले. 

चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरवले त्याचे काय ?

त्याचा राग वाढत गेला लाठी काठीने मारण्याचे प्रमाण वाढले. वाचवा वाचवा असा आक्रोश करु लागली. पुढे कोणी जात नसल्याने रक्तबंबाळ झालेल्या सासुचे काही खरे नाही म्हणून सून असलेली मिराबाई आपल्याला सासुला सासऱ्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धडपड करत त्या वादात पडली. त्या नराधम सासऱ्याचा राग अनावर झाला, त्याने जमिनीवर पडलेल्या आपल्या बायकोला सोडून मिराबाईलाच काठीने झोडपून बेदम मारहाण केली. त्यानंतर तो पसार झाला. सुनेला रुग्णालयात काही भावकिची मंडळी आणत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. किशन मोरे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तो कारागृहात स्थानबद्ध आहे. त्याला शिक्षा होईल पण या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरवले त्याचे काय असा असा प्रश्न उपस्थित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The father-in-law will be punished, but what about the one who lost the of 'those' two childrens nanded news