esakal | परभणीचे राजकिय वातावरण तापले : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांच्या राजीनाम्यासाठी भाजप युवा मोर्चाची निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२७) निदर्शने केली.

परभणीचे राजकिय वातावरण तापले : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांच्या राजीनाम्यासाठी भाजप युवा मोर्चाची निदर्शने

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः धुळे येथे बुधवारी (ता.२६) विद्यार्थांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२७) निदर्शने केली. या प्रकरणाची जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री उदय सामंत व अब्दुल सत्तार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरातील विद्यार्थी परीक्षा ने घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोनामुळे नागरीकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या २०२० - २१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे या मागण्या करत आहेत. धुळे येथे याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थांवर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत लाठीहल्ला करण्यात आला. विद्यार्थांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष रामराव पवार, आनंता गिरी, रोहित जगदाळे, निरज बुचाले, अनिल जाधव यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक

आंदोलकांनी या केल्या मागण्या

कोरोना वैश्विक महामारीमुळे राज्यातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली आहे. याचा विचार करता विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ चे ३० टक्के शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हाप्त्यामध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अश्या सर्व विद्यार्थांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थांना परत करावे, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले. परंतू जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अश्या विद्यार्थांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अश्या सर्व विद्यार्थांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे, परीक्षेबाबत या धोरणाच्या पातळीवर घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

राज्यात शिक्षण व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला

राज्यात शिक्षण व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. कोरोनाच्या काळात विद्यापीठे विद्यार्थांची लूट करत आहेत. चुकीच्या निकालामुळे अनेक विद्यार्थांचे आयुष्य उध्दस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. याची जबाबदारी स्विकारत मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थांच्या या प्रकरणात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

- सुरेश भुमरे, जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image