माहूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीमधून एक नामनिर्देशन पत्र दाखल

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार माहूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कल मधून दहा ग्रामपंचायतिचे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक केवळ एका उमेदवाराने आतापर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केला असून अनेकांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. तीन दिवसाच्या सलग सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मात्र प्रचंड गर्दी होणार आहे.

माहूर तालुक्यात वाई बाजार आणि वानोळा सर्कलमधील सिंदखेड, हरडप, आष्टा, लिंबायत, सेलू, हडसणी, मेट, अनमाळ, पापलवाडी व असोली अशा दहा ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहे. दहा ग्रामपंचायतपैकी शुक्रवार (ता.२४) पर्यंत केवळ सिंदखेड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभाग माहूरने दिली आहे.अनेक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून ठेवली असल्याने येथे सोमवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळेल असे चित्र आहे.

दहा ग्रामपंचायतमध्ये सहा हजार 678 पुरुष व सहा हजार 59 महिला असे एकूण बारा हजार 737 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. होऊ घातलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 82 उमेदवार निवडून द्यायचे आहे. त्यापैकी 46 महिला व बाकी इतर उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. 30 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडणार असून यात एक केंद्र संवेदनशील आहे. सर्वच मतदान केंद्रासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त निवडणुक विभागाने राखीव केला आहे. चार रिटर्निंग अधिकारी व त्यांना आठ सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पंचायत समिती, कृषी विभाग व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कार्यालयीन कामाचे नियंत्रण व नियोजन ठेवण्यासाठी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व्ही. टी. गोविंदवार, अव्वल कारकून योगिता राठोड, लिपिक प्रभू पानोळे, प्रकाश कुडमते आदी कर्मचारी कार्यरत आहे. अशा पद्धतीने निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.

एकंदरीत गाव कारभारी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.परंतु सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने हवश्या नेत्यांचं रक्तदाब कमी जास्त होत आहे.तर अभ्यासू मंडळींना सरपंच आरक्षण काय निघेल हे चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. कारण अधिकांश ग्राम पंचायती पेसा अर्थात आदिवासी उपयोजना क्षेत्रांमध्ये समाविष्ट असल्याने अनुसूचित जमातीचाच सरपंच होईल व महिला- पुरुष आरक्षणाच्या बाबतीत रोटेशन पद्धतीनुसार विद्यमान सरपंच पुरुष असेल तर महिलांचे आरक्षण निघेल व विद्यमान सरपंच महिला असेल तर पुरुष वर्गाचे आरक्षण निघेल असा साधा आणि सोपा गणित लावून कामाला लागले आहेत.

गावात कोंबड्याची झुंज लावणारे राजकीय पुढारी मात्र अलिप्त...

एरवी लोकसभा- विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामपंचायत स्तरावरील कार्यकर्त्यांचा पुरेपुर वापर करून घेणारे राजकीय पुढारी होऊ घातलेल्या दहा गावातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये कमालीचे अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. आपल्या निवडणुकांमध्ये घोटभर दारू आणि मूठभर चिवडाचा सूत्र वापरून स्थानिक गावात तंटा लावून कोंबड्याची झुंज पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी लॉकडाउनमुळे निवडणूक खर्चात काटकसर करण्याचा मूलमंत्र दिल्याने पॅनल प्रमुखांना नाईलाजाने आहे. त्या भांडवलात निवडणूक लढविण्याचा निश्चय करावा लागला आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com