आंतरजिल्हा एसटी​ बस वाहतुकीत नांदेड राज्यात प्रथम

file photo
file photo

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्व काही ठप्प झाले होते. नंतर टप्प्याटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यात आला त्याचबरोबर ता. २२ मे पासून राज्यात महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाची बससेवा सुरु करण्यात आली. नांदेडलाही नऊ आगारामार्फत बससेवा सुरु झाली. सुरवातीला अडचणीतून मार्ग काढत नांदेड जिल्ह्याने राज्यात जिल्हातंर्गत वाहतुकीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची कोरोना आणि लॉकडाउनमुळे ता. २१ मे पर्यंत बससेवा बंद होती. ता. २२ मे पासून ती सुरू झाली. नांदेडलाही बससेवा सुरु झाली. सुरवातीला काही दिवस अडचणी आल्या पण त्यावर मात करत नांदेड जिल्ह्याने आंतरजिल्हा बस वाहतुकीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

नांदेड विभागात नऊ आगार
नांदेड जिल्ह्यात नांदेड, माहूर, किनवट, भोकर, बिलोली, देगलूर, हदगाव, मुखेड, कंधार असे नऊ आगार असून प्रत्येकी बाराशे वाहक आणि चालक तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व कामगार असे एकूण तीन हजार चारशे कर्मचारी आहेत. जिल्ह्यात नऊ आगारात बसची संख्या पाचशेच्या आसपास असल्याची माहिती एस टी महामंडळाच्या नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांनी दिली. 

दररोज ३७ ते ३८ हजार किलोमीटर
सध्या नऊ आगारात दररोज शंभर ते ११० बस जिल्ह्यातंर्गत धावत असून त्याच्या ६०० ते ६५० फेऱ्या होत आहेत. ३७ ते ३८ हजार किलोमीटर होत असून त्यातून आठ लाखापर्यंत उत्पन्न होत आहे. सोमवारी (ता. २९ जून) दिवसभरात ३७ हजार ८०० किलोमीटर झाले असून त्यातून आठ लाख ६३ हजार ३६५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नांदेड आगारातून २३, माहूरला चार, किनवटला नऊ, भोकरला नऊ, बिलोलीला बारा, देगलूरला १५, हदगावला सहा, मुखेडला १५ तर कंधार आगारातून दहा अशा सरासरी बस धावत आहेत. 

सुरवातीला झाली अडचण
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात बससेवा बंद होती. त्यानंतर ता. २२ मे पासून जिल्हातंर्गत सुरुवात झाली. सुरवातीला अडचणी आल्या. किलोमीटरमागे तीन ते चार रुपये उत्पन्न झाले. नंतर १० ते १२ रुपयांपर्यंत गेले आणि सध्या १५ रुपयांच्या पुढे आहे. डिझेलचा खर्च निघण्यास सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांचेही वेतन होत आहे. मार्च महिन्यात ५०, ७५ आणि शंभर टक्के असे वर्गवारीनुसार झाले. एप्रिलमध्ये शंभर टक्के तर मे महिन्यात ५० टक्के झाले आहे. आता परिस्थिती पाहून शंभर ते ११० बस जिल्हातंर्गत धावत आहेत. 

२२ प्रवाशांची मर्यादा 
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी एसटी महामंडळातर्फे जिल्ह्यातील नऊ आगारात अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत आवश्‍यक ती सर्व काळजी घेण्यात येत  आहे. सध्या एका बसमध्ये २२ प्रवाशांची मर्यादा दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे जास्तीत जास्त पालन करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत नांदेडचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून प्रवाशांचाही प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळे नांदेड विभाग जिल्हातंर्गत वाहतुकीत राज्यात प्रथम आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांनी दिली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com