Video - ज्या माशांच्या मृत्युमुळे नांदेडमध्ये माजली होती खळबळ, त्याचे कारण आले समोर

प्रमोद चौधरी
Sunday, 14 June 2020

गोदावरीचे पात्र दूषित पाणी व दुर्गंधीमुळे केवळ नांदेडकरांनाच नव्हे तर देश विदेशातून आलेल्या भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे. गुरुतागद्दी सोहळ्यानिमित्त नदीकाठचे सुशोभीकरण करण्यात आले. पण गोदावरीच्या स्वच्छेतेची काळजी महापालिकेने घेतली नाही. 

नांदेड : गोदावरी नदीचा उगम नाशिक जिहयातील त्र्यंबकेश्वर येथून झाला. नदीची लांबी १४४० किमी असून महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या  दोन राज्यामध्ये ही नदी वाहते. महाराष्ट्र मध्ये गोदावरी नदीचा ७ जिल्यामध्ये प्रवाह आहे. ते नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड,  जालना,  परभणी व नांदेड. विशेष म्हणजे गोदावरी नांदेड जिल्ह्यात १०.५ किमी वाहते व याच नदीवर विष्णुपुरी प्रकल्प बांधण्यात आला. 

गोदावरी  पात्रात कतला, रोहू, म्रिगल, कोलेशी व इतर विविध जातीचे मासे भरपूर प्रमाणात मिळतात. नांदेड शहरामध्ये महत्वाची तीन मत्स्य बाजार असून त्यातले बुधवार बाजार, इथवर बाजार व शुक्रवार बाजार. पावसाळ्यात नदी काठच्या भागात १५० ते २०० टन मासे स्थानिक मासळी बाजारात येतात. सध्या एक टन मासे बाजारात येत आहेत. विष्णुपुरी, गोदावरी नदीच्या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. नांदेड जिल्यात ११६ मच्छिमार सहकारी संस्था आहेत.   

हेही वाचा - सावधान : नांदेडकरांनो कन्टेनमेन्ट झोनची संख्या ४० वर

दुसरी बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी गोदावरी नदी व नदीचा परिसर सुंदर व रमणीय होता, कारण नदीच्या परिसरात प्रचंड वरक्ष होते. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी व पर्यटक पक्षी येथे यायचे. तसेच नदीमध्ये प्रचंड वाळू साठा असल्यामुळे कासव व इतर प्राणी नदीकाठी पाहायला मिळायचे. काही लोकांच्या स्वार्थापोटी व महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस प्रदुषित होत आहे. नदीकाठावरील झाडेही तोडली जात असल्याने सौंदर्य नष्ट झाले आहे. 

गोदावरी पात्रातील दुषीत पाण्यामुळे आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे नदीपात्रातील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रन मंडळ दर महिन्याला तपासणीसाठी औरंगाबाद पाठवतात. पण ते फक्त नावालाच होते की काय, अशी शंका शनिवारच्या (ता.१३ जून) घटनेवरून स्पष्ट होत आहे.  

हे देखील वाचा - नांदेडच्या ‘या’ आमदारांचा असाही विरंगुळा -

मनपाचा गलिच्छ कारभारच आहे जबाबदार
पाच जून रोजी गोदावरी नदी प्रदूषमुक्त करण्याची मागणी केली होती. परंतु, गलिच्छ कार्यभार असलेल्या महापालिकेने दखल घेतली नसल्यामुळे आज हजारो मासेच नाही तर इतरही जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहे. परिणामी परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे प्रकल्पातील मासे गोदावरी नदीपात्रात आले आहेत. मात्र, पात्रामध्ये ड्रेनेजचे पाणी सोडलेले असल्यामुळे तसेच २४ तास सॅनिटायझरचा वापर होत असल्याने नदीचे पात्र अधिकच प्रदुषित झाले असल्याचे अभ्यासक प्रा. किरण शिल्लेवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Fish That Died In Nanded Was A Sensation Nanded News