नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबातील पाच जणांनी घेतली सहस्त्रकुंड धबधब्यात उडी 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील व्यापाऱ्याने पत्नी व तीन मुलांसह सहस्रकुंड धबधब्यात उडी मारली.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील व्यापाऱ्याने पत्नी व तीन मुलांसह सहस्रकुंड धबधब्यात उडी मारली.

हदगाव, इस्लापूर (जि. नांदेड) - हदगाव शहरातील व्यापारी प्रविण कवानकर (वय ४२) यांनी पत्नी अश्विनी (वय ३८), मोठी मुलगी सेजल (वय २०), दुसरी मुलगी समीक्षा (वय १४) आणि मुलगा सिद्धेश (वय १३) या पाच जणांनी इस्लापूरजवळ (ता. किनवट) सहस्रकुंड धबधब्यात उडी मारली. त्यापैकी गुरूवारी (ता. एक) प्रविण कवानकर, अश्विनी आणि सिद्धेश यांचे मृतदेह मिळाले असून मुलगी सेजल व समीक्षा या अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हदगाव तालुक्यामधील कवाना येथील ज्येष्ठ व्यापारी भगवानराव कवानकर हे अनेक वर्षापासून हदगाव शहरात व्यापार करत असून त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. मागील आठ दिवसांपासून त्यांच्या दोन मुलांच्या मालमत्तेचा वाद सुरू असल्याची माहिती असून गेल्या आठ दिवसापासून शहरातील त्यांचे प्रतिष्ठानही बंद होते. वादाला कंटाळून त्यांचा मोठा मुलगा प्रवीण कवानकर हे पत्नी अश्विनी तसेच मोठी मुलगी सेजल, दुसरी मुलगी समीक्षा आणि लहान मुलगा सिद्धेश हे कुटुंब दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी गाडी भाड्याने करून सहस्त्रकुंड येथे गेले होते. आमचा मेव्हणा येत असल्याचे सांगत ती भाड्याची गाडी त्यांनी परत पाठवून दिली. त्यानंतर हे सर्वजण विदर्भाच्या बाजूने असलेल्या मुरली गावानजीक (जि. यवतमाळ) असलेल्या ठिकाणी गेले व तेथून धबधब्यात उड्या मारल्याची माहिती देण्यात आली. 

तिघांची ओळख पटली
दरम्यान, परोटी (ता. किनवट) परिसरात पैनगंगा नदीकाठी एका व्यक्तीचा अनोळखी मृतदेह बुधवारी (ता. ३०) आढळून आला. या व्यक्तीच्या खिशात मोबाईल सापडल्याने या मृत व्यक्तीची माहिती मिळू शकते, अशी माहिती पोलीस उपनिरिक्षक श्रीकिसन कांदे यांनी दिली होती. त्यानुसार संपर्क केला असता हे हदगाव येथील व्यापारी असल्याची माहिती मिळाली. या बाबत इस्लापूर पोलीसांनी संबंधितांच्या नातेवाईकांना गुरूवारी (ता. एक) पोलीस ठाण्यात बोलावून खात्री केली असता वडील व मुलाची ओळख पटली आहे. त्यानंतर दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदीकाठी एका महिलेचा मृतदेह सापडला. सदरील मृतदेह प्रविण यांची पत्नी अश्विनीचा असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. गुरूवारी सायंकाळपर्यंत दोन मुलींचा शोध अद्याप लागला नसून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हदगावला घटनेबाबत हळहळ व्यक्त
घडलेल्या या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी हदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुटुंबाने एवढा धाडसी निर्णय घेतला कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रविण कवानकर यांनी कुटुंबातील पत्नी व तीन मुलांना कसे तयार केले असावे? हा ही प्रश्न आहे. आता प्रविणच्या सासरवाडीतील मंडळी काय निर्णय घेणार? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत इस्लापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी इतर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून समन्वय ठेऊन काम करत आहेत.

(संपादन - अभय कुळकजाईकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com