जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह, नऊ जणांचे दुसरे रिपोर्ट निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

शुक्रवारी (ता. २९) सकाळी १०४ आणि सायंकाळी पुन्हा ११३ अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ९७ अहवाल निगेटिव्ह, तर संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १०८ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अनिर्णित, तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने सापडलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेचा, तर चार पुरुषांचा समावेश आहे. संध्याकाळी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) नव्याने पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १४३ इतकी झाली आहे. विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुखेड येथील एका पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

बुधवारी (ता. २७) पाठवलेले ७३ स्वॅब व गुरुवारी (ता. २९) १९२ अहवाल तपासणीचे काम सुरू होते. त्यामुळे या अहवालाकडे जिल्हा प्रशासनासह सर्वांचेच लक्ष लागले होते. बुधवारी आणि गुरुवारी पाठवलेल्या एकूण स्वॅब अहवालांपैकी शुक्रवारी (ता. २९) सकाळी १०४ आणि सायंकाळी पुन्हा ११३ अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ९७ अहवाल निगेटिव्ह, तर संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १०८ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अनिर्णित, तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने सापडलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेचा, तर चार पुरुषांचा समावेश आहे. संध्याकाळी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- Video : आपल्याच गावात रोजगाराच्या संधी शोधा, परिस्थितीचा सदुपयोग करा

इतवारा भागातील नागरीकांनी दक्ष राहण्याची गरज 

लोहार गल्लीत अजून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. करबला आणि कुंभार टेकडी परिसराबरोबरच आता लोहार गल्ली येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. अनेक नागरिक काळजी घेत नसल्यानेच इतवारा भागात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे इतवारा भागासह लोहार गल्ली, करबलानगर व कुंभार टेकडी या भागातील नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी केले आहे.

हेही वाचा- तर वाडी तांड्यावर इंग्रजी शाळांचा जन्म होईल

नऊ जणांचा अहवाल निगेटिव्ह

दुसरीकडे एनआरआय यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथील आठ व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील एका रुग्णाची प्रकृती बरी झाल्याने शुक्रवारी (ता. २९) नऊ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. सकाळी सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मित्तलनगर भागातील ३२ वर्षीय, तर लोहार गल्लीतील २८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच मुखेड तालुक्यातील ४० वर्षीय महिलेचाही यात समावेश आहे. यासह दोन रुग्ण हे हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five positive In The District Second Report Negative Of Nine Nanded News