गाळे लिलावप्रकरणी आता उपोषणास्त्र

सुरेश घाळे
Saturday, 10 October 2020

नगरपरिषदेच्या फंडातून बांधकाम केलेल्या जुन्या नगरपरिषदेच्या जागेतील एकूण आठ दुकान गाळ्यांचा लिलाव नियमानुसार करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना (ता.१९) ऑगस्ट रोजी दिले आहे. परंतु दिड महिना उलटूनही सदरील लिलाव प्रक्रिया सुरू झाली नाही. गाळे लिलाव जाहीरपणे करण्यात यावे, या मागणीचे निवेदन अनेकवेळा देण्यात आले. तरीही या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया, निविदा प्रक्रिया राबवण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत होते.

धर्माबाद, (जि. नांदेड) : नगरपरिषदेच्या फंडातून बांधकाम केलेल्या जुन्या नगरपरिषदेच्या जागेतील एकूण आठ दुकान गाळ्यांचा लिलाव नियमानुसार करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना (ता.१९) ऑगस्ट रोजी दिले आहे. परंतु दिड महिना उलटूनही सदरील लिलाव प्रक्रिया सुरू झाली नाही. गाळे लिलाव जाहीरपणे करण्यात यावे, या मागणीचे निवेदन अनेकवेळा देण्यात आले. तरीही या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया, निविदा प्रक्रिया राबवण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत होते. सदरील व्यापारी गाळे नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवकांनी ‘मलिदा’ खाऊन आपल्या मर्जीतल्या व्यापाऱ्यांना गाळे देण्याचा घाट रचविल्याचे समजताच शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे
शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन १९९८ मध्ये झाले असून सदरील मालमत्तेचा रिव्हिजन दर चार वर्षांला करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या १८ वर्षांपासून शहरातील मालमत्तेचे रिव्हिजन करण्यात आले नाही. १९९८ च्या रिव्हिजन प्रमाणे शहरातील मालमत्तेचे वार्षिक कर पालिका कर्मचारी आकारतात. परंतु सदरील प्रकारामुळे पालिकेचा दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. सदरील व्यापारी गाळ्यांचे लिलाव नियमानुसार करण्याची मागणी काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्याकडे करण्यात आली आहे. परंतु नगरसेवकांनी केलेल्या मागणीकडेही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. जाहीरपणे लिलावप्रकरणी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र पालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

हेही वाचा -  नांदेड वनविभाग : निबंध, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांची जंगलस्वारी -

निवेदनाला केराची टोपली 
जिल्हाधिकारी यांनी नियमानुसार सदरील लिलाव प्रक्रिया करण्याच्या लेखी सुचना मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांना देऊनही दिड महिना उलटला आहे. तरीही सदरील लिलाव प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रियेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपूर्वी सदरील लिलाव प्रक्रिया नियमानुसार करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर यांनी मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवली. अखेर शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर यांनी या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया, निविदा प्रक्रिया जाहीरपणे राबवावी, अन्यथा (ता.१२) ऑक्टोंबर रोजी उपोषण करण्याचा लेखी इशारा पालिका प्रशासनास दिला आहे.

शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल
येत्या आठवड्यात गाळे लिलाव प्रक्रिया जाहीरपणे करण्यात येणार असून गाळे लिलावप्रकरणी उपोषण मागे घेण्यात यावे, असे लेखीपत्र शुक्रवारी (ता.नऊ) रोजी पालिकेकडून मिळाले असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली आहे. त्यामुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले असून येत्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार न पडल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल. असे अनिल कमलाकर, शिवसेना शहर प्रमुख धर्माबाद यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Floor Auction Should Be Done Openly, Nanded News