बेरोजगारांसाठी पिठाची गिरणी ठरतेय उपजिविकेचे साधन 

शिवचरण वावळे
Friday, 18 September 2020

हाताला काम नसल्याने गाव आणि शहरातील अनेक युवकांनी पिठाची गिरणी सुरु करुन नव्याने कामाची सुरुवात केली आहे. पिठाची गिरणी ही बेरोजगारांसाठी उपजिविकेचे साधन ठरत असल्याचे चित्र आहे. 

नांदेड - कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउनची घोषणा झाली. या दरम्यान अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे गावाकडून नोकरीसाठी शहरात गेलेले लाखो तरुण बेरोजगार होऊन पुन्हा गावी परत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने गाव आणि शहरातील अनेक युवकांनी पिठाची गिरणी सुरु करुन नव्याने कामाची सुरुवात केली आहे. पिठाची गिरणी ही बेरोजगारांसाठी उपजिविकेचे साधन ठरत असल्याचे चित्र आहे. 

कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे घरापासून दूर अंतरावर असलेल्या पिठाच्या गिरणीवर दळणासाठी जाण्यास कुणीच धजावत नाही. जवळच्या आणि घरगुती पिठाच्या गिरणीवर लोकांची मदार आहे तर अनेकांनी बाहेरुन दळण आणायचेच नाही, अशा बेताने एक ते दोन एचपी (सिंगल फेज) पिठाची गिरणी खरेदी करण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येते. 

हेही वाचा- Video - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही

गिरणीसह इतर साहित्यांच्या किंमतीमध्ये किंचित वाढ

सध्या बाजारात आठ हजारापासून ते सव्वालाख रुपयांपर्यंत किंमतीच्या विविध प्रकारच्या आणि कंपनीच्या पिठाच्या गिरण्या उपलब्ध झाल्या आहेत. पिठाच्या गिरणीसह मिरची - मसाला ग्राइंडर, चिप्स मशीन, शेवया, मॅगी, कांदा - लसूण पेस्ट मशीन अशा विविध प्रकारच्या गिरणी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांची मागणी वाढल्याने नामांकित कंपनीच्या गिरण्यांचा बाजारात तुटवडा जाणवू लागला असून, कंपनी मालकांनी गिरणीसह इतर साहित्यांच्या किंमतीमध्ये किंचित वाढ देखील केली असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा-  प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली ​

दिवसाला शंभर गिरण्यांची विक्री

विविध प्रकारच्या गिरण्या मिळण्याचे नांदेड हे औरंगाबादनंतर दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जिल्ह्यासह, परभणी, हिगोंली, यवतमाळसह तेलंगणा राज्यातील गावातून ग्राहक गिरणी खरेदीसाठी शहरात येत आहेत. एरवी ग्राहकांच्या प्रतिक्षेत असलेल्या मार्केटमध्ये दुकाने उघडण्यापूर्वीच ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. दिवसाला विविध कंपनीच्या किमान शंभर गिरण्यांची विक्री होत असल्याचेही सांगण्यात आले. 

कमी गुंतवणूक करुन रोजगाराची संधी 
पूर्वी घरगुती पिठाच्या गिरणीला जिथे मोठा परिवार आहे त्यांच्याकडूनच मागणी असायची. परंतु कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे अनेकांच्या मनात बाहेर जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे घरगुती गिरणी खरेदीला प्रतिसाद चांगला मिळत आहे. शिवाय बेरोजगार युवकांना देखील कमीत कमी गुंतवणूक करुन रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. 
- महेश लोलगे, गिरणी विक्रेता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flour mill is a means of livelihood for the unemployed Nanded News