दऱ्याखोऱ्यात बहरली वनराई

प्रकाश जैन
Friday, 28 August 2020


तालुक्यात दमदार पावसाने चांगली सुरवात केली असून या नैसर्गिक पावसाच्या साथीने धरणीमाता ओलीचिंब झाली आहे. नदी, नाले चांगले ओल धरून वाहत असून या निसर्गचक्रात वनराई बहरली आहे. निसर्गरम्य वातावरणाचे दृश्‍य मन मोहून घेत असल्याचा प्रत्यय जाणवत आहे. दऱ्याखोऱ्‍यात लहान मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. हिमायतनगर आणि तालुक्यात सध्या पावसामुळे नैसर्गिक वातावरणात अनुभवयास मिळत आहे. 

हिमायतनगर, (जि. नांदेड) ः तालुक्यात दमदार पावसाने चांगली सुरवात केली असून या नैसर्गिक पावसाच्या साथीने धरणीमाता ओलीचिंब झाली आहे. नदी, नाले चांगले ओल धरून वाहत असून या निसर्गचक्रात वनराई बहरली आहे. निसर्गरम्य वातावरणाचे दृश्‍य मन मोहून घेत असल्याचा प्रत्यय जाणवत आहे. दऱ्याखोऱ्‍यात लहान मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत.

हेही वाचा -  परभणी : जेईई- नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉग्रेस रस्त्यावर

हिमायतनगर आणि तालुक्यात सध्या पावसामुळे नैसर्गिक वातावरणात अनुभवयास मिळत आहे. तालुक्याच्या दक्षिण दिशेला तेलंगणाच्या सीमेलगत डोंगररांगांनी हिरवा शालू परिधान केला आहे. या ठिकाणी असलेली अनेक दुर्मिळ जातींची झाडे, पाने, फुले लक्ष वेधून घेत आहेत. ओढ्याचा खळखळाट, अधूनमधून मंजूळ पाखरांचा किलबिलाट पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकत आहे. दऱ्याखोऱ्‍यात लहानमोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत.

सर्वत्र परिसर हिरवागार झाला
विविध जातींच्या जंगली प्राण्यांना जंगलात मुबलक प्रमाणात अन्न, पाणी मिळत असल्याने सकाळच्या वेळी अनेक प्राणी पाहावयास मिळत असल्याचे दऱ्याखोऱ्यात राहणारे आदिवासी बांधव सांगत आहेत. तालुक्यात दक्षिणेला लागून मोठे जंगल असून विदर्भाला लागून पैनगंगा अभयारण्य असल्याने सर्वत्र परिसर हिरवागार झाला आहे. त्यातच धो - धो पाऊस पडत असल्याने वातावरण सुखद झाले आहे. सायंकाळच्या वेळी रानावनात मोराचे थवे, हरणाचे कळप वाटसरूचे लक्ष वेधून घेत आहेत.

सोन्याहून पिवळे हे पडले ऊन
जवळच असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे निरव शांतता दिसून येत आहे. तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन...
चोहीकडे लसलसीत बहरल्या हिरवळी छान...
पांघरली जरतारी जांभळी वनमाला शाल...
ही बालकवींची कविता ओठावर आल्याशिवाय राहत नाही.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forests Flourishing In The Valley, Nanded News