आश्चर्य : गॅसवन एजन्सीच्या नावाखाली वकिलाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

गॅसवन कंपनीची नरसी (ता. नायगाव) येथे एजन्सी देण्याच्या नावाखाली एका वकिलाची पाच लाखाची फसवणूक. मुंबईच्या दोघांसह लातूरच्या तिघांवर तब्बल सहा वर्षानी रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

नांदेड : गॅसवन कंपनीची एजन्सी देतो म्हणून चक्क एका वकिलाची पाच लाखाची फसवणुक करण्यात आली. हा प्रकार ता. २५ मार्च २०१५ ते ता. २१ मे २०१५ च्या दरम्यान नरसी फाटा (ता. नायगाव) येथे घडला होता. याप्रकरणी चौकशीअंती अखेर रामतिर्थ पोलिस ठाण्यात मुंबईच्या दोघांसह लातूरच्या तिघांवर बुधवारी (ता. २४) जून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नरसी (ता. नायगाव) येथील महेबुबनगर भागात राहणारे वकिल अविनाश मधुकरराव निलंगेकर (वय ४०) यांना गॅसवन गॅसची एजन्शी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. गॅसवन कंपनीच्या नावाखाली कंपनीचा संचालक व व्यवस्थापक यांनी लातूरच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत अविनाश निलंगेकर यांच्यापर्यंत पोहचले. कंपनीचे सर्व बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवून श्री. निलंगेकर यांच्याकडून पाच लाख रुपये काढून घेतले. यात रोख २० हजार रुपये व बाकीची रक्कम ही बँकेमार्फत त्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केली. एकवेळेस तीन लाख ५१ हजार आणि पुन्हा दीड लाख अशी रक्कम जमा केली.

हेही वाचा -  सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा

रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

पैसे देऊनही गॅसवन कंपनीची एजन्सी मिळाली नाही. त्यांनी श्री. निलंगेकर यांनी संचालक रणजीत चौधरी यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच लातूर येथील तिघांनी परत पैसे मागितले तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. शेवटी म्हणजेच पाच वर्षानंतर वकिल असलेल्या श्री. निलंगेकर यांनी रामतिर्थ पोलिस ठाण्यात फसवणुक झाल्याची तक्रार दिली. 

तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे करत आहेत

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी गॅसवन कंपनीचा डायरेक्टर रणजीत तुकराम चौधरी आणि व्यवस्थापक दिलीप भवनानी दोघे राहणार शाईन टावर कामगार स्टेडीअमसमोर सेनापती बाबट मार्ग मुंबई यांच्यासह आयुब महेबुब देशमुख रा. टाकेनगर, लातूर, अतीक शेख उदगीरकर व महेबुब यासीन देशमुख रा. लातूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of a lawyer under the name of GasOne Company nanded news