आमचे नाही तर मुलांचे तरी स्वप्न पूर्ण करा...

प्रमोद चौधरी
Saturday, 9 May 2020

दिवसाकाठी मिळणाऱ्या अल्पशा मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलतानाच विविध सोंग धारण करण्याकरिता लागणाऱ्या साधनांचीही तजवीज करावी लागते. त्यात मेकपचे साहित्य व विविध प्रकारचे कपडे खरेदी करावे लागतात.

नांदेड : अनादिकालापासून समाजात उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरूपी म्हणून ओळखली जाते. आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम हा समाज करत आहे. मात्र, वाकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याने त्यांची कथा ही व्यथा झाली आहे.  

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. विविध जातीधर्मातील देवदेवतांच्या वेशात गावात फिरून मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करणारा बहुरुपी समाज. आपल्या कलेतून समाजाचे प्रबोधन करणे हाच त्यांचा पारंपारिक व्यवसाय. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. कलावंतामध्ये सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरूपी कलावंतांचा समाज.

हेही वाचाच - Nanded Breaking : जम्मुचे दोन यात्रेकरु पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ४०

लॉकडाउनमुळे उपासमार
विविध देव-देवतांची,पोलिसांची रुपे घेऊन दारोदार, तसेच बाजारपेठेमध्ये भरून लोकांचे मनोरंजन बहुरुपी करत असतात. मात्र, २२ मार्चला जनता कर्फ्यू तर २४ मार्चपासून देश लॉकडाउन करण्यात आला आहे. परिणामी, अत्यावश्‍यक वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद आहे. बाजारपेठाही थंडावल्या आहेत. त्यामुळे भटकंती करत पोटाची खळगी भरणाऱ्या बहुरुप्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. शासन जरी मोफत अन्नधान्य देत असले तरी, हे बहुरुपी त्यापासून वंचितच आहेत. कारण, त्यांच्याजवळ ना रेशनकार्ड, ना आधार कार्ड, ना घर. त्यामुळे त्यांची मोठी उपासमार होताना दिसत आहे.

वंशपरंपरेनुसार जपतात कला
बहुरूपी समाजाची अवस्था आज दयनीय असल्याचे वास्तव दिसत आहे. वंशपरंपरेनुसार बहुरूपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्षित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नांदेड शहरामध्ये या समाजातील सुमारे नऊ ते दहा कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रुपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. यात सलवार परिधान करून कॉलेज कुमारिका, साडी घालून गृहिणी, गरोदर महिला, पोलिस, डॉक्टर, लैला मजनू, शंकर-पार्वती, हनुमान, रामसीता अशी विविध रुपे धआरण करून समाज प्रबोधन करून त्यातून मिळणाऱ्या तोकड्या मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

हे देखील वाचायलाच पाहिजे - संचारबंदी... वाळू माफियांची मात्र चांदी

शिक्षणानंतरही नाही नोकरी
बहुरुपी समाजाकडे शेती नाही, कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविण्यात येत नाही. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. उन्हाळ्यामध्ये व दिवाळीत या समाजातील पुरुष मंडळी इतर जिल्ह्यांमध्ये केलेचे प्रदर्शन करण्याकरिता जातात. त्यानंतरच्या कालावधीत गावाकडेच मिळेल ते काम करून आपली उपजिविका चालवितात.

शासनाने सवलती द्याव्यात
आमच्या मुलांनी बहुरुपीचे सोंग घेऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करावयाचे आहे; परंतु शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने शक्य होत नाही. ओढाताण करून शक्य केले तर नोकरी मिळत नाही. त्यामुळे शासनाने आमच्यासाठी सवलती द्याव्यात एवढीच अपेक्षा आहे.  
- श्रावण तांदुळकर (बहुरुपी कलावंत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fulfill The Dream Of Our Children Nanded News