शैक्षणिक संस्थांचा सक्तीच्या शुल्क वसुलीचा फंडा, कसा? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Friday, 28 August 2020

कोरोनाची दहशत अन या दहशतीत संपूर्ण देश होरपळला आहे. त्यात ऐन मार्च महिन्यातच कोरोनाचा फैलाव वाढल्याने संपूर्ण देशात लाॅकडाउन करण्यात आल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय? अशी भिती असताना विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक वाटचालीवर त्यांचे निकाल लावण्यात आले. 

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू शैक्षणिक सत्राचा प्रश्न असतानाच आॅनलाईनचा फंडा काढण्यात आला. या आॅनलाइनच्या कचाट्यात आधीच लाॅकडाउनमध्ये होरपळलेला पालक अॅण्ड्राईड मोबाईल व संगणक घेण्याच्या विवंचनेत अडकला. त्यावरही तोडगा काढत असतानाच शाळांकडून चालू शैक्षणिक सत्राचे शुल्क भरण्याचा तगादा लावल्याने पालक अक्षरशः वैतागून गेले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण देशच लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे शाळाही बंद झाल्या. कोरोनाची परिस्थिती लवकरच निस्तारेल व सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत होते. परंतु, कोरोनाचा फैलाव वाढतच गेला अन लाॅकडाउनही वाढतच गेला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून  आॅनलाईनचा शिक्षणाचा मार्ग निघाला. तो काही प्रमाणात यशस्वीही होताना दिसत आहे. परंतु, शैक्षणिक संस्थांच्या शुल्क भरण्याच्या तगाद्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा नेटवर्कसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी माळरानावर

विशेष म्हणजे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा जोपर्यंत सुरु होणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेण्यात येवू नये असे आदेश काढले. त्यातच शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे फर्मानही सोडले. मात्र, याला न जुमानता अनेक शाळांनी नवनवीन शक्कल लढवित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना फी वसुलीसाठी तगादा लावण्याचे सर्रास प्रकार बघायला मिळत आहे. याविरोधात आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकही अशा शैक्षणिक संस्थांची तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. याचाच फायदा या संस्था चालकांकडून घेतला जात आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन, कुठे ते वाचा?
 
सुविधा नसताना पूर्ण शुल्क का?
शाळा सुरु होत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्क वसुल न करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी काढले आहे. तरी देखील संस्थांकडून फी वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला जातो आहे. विशेष म्हणजे चालू वर्षाची शैक्षणिक फी आकारताना संपूर्ण वर्षाचे शुल्क आकारण्यात आलेले आहे.  मात्र, आजरोजी केवळ आॅनलाइन शिक्षण सुरु आहे. इतर कुठल्याही सुविधा शाळांकडून पुरविण्यात येत नसताना सर्व प्रकारचे शुल्क आकारणी का? असा प्रश्न अनेक पालकांमधून उपस्थित होत आहे.  

येथे क्लिक कराच - हैवान सासऱ्याला शिक्षा होईल, मात्र ‘त्या’ दोन चिमुकल्यांचे छत्र हरवले त्याचे काय...?
 

संस्थाचालकांची धमकी
‘‘शैक्षणिक संस्थांकडून शैक्षणिक फी वसुलीच्या तगाद्याचे फोन, मॅसेजवर मॅसेज येत आहेत. मात्र, पालकांची आर्थिक परिस्थिती लॉकडाउनमुळे कोलमडल्याने शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. शुल्क भरले तरच पाल्याला युजर आयडी व पासवर्ड दिला जाईल, अन्यथा नाही’, अशी धमकी दिली जात असल्याचे एका पालकाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fund For Compulsory Fee Recovery Of Educational Institutions Nanded News