esakal | दरोडेखोरांची टोळी पिस्तुल व खंजरसह अटक- स्थागुशा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, खंजर व चोरीची दुचाकी जप्त केली. मात्र नऊ जण पसार झाले.

दरोडेखोरांची टोळी पिस्तुल व खंजरसह अटक- स्थागुशा 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लिंबगाव (ता. नांदेड) शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, खंजर व चोरीची दुचाकी जप्त केली. मात्र नऊ जण पसार झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लिंबगाव शिवारातील कॅनालच्या पुलाखाली शनिवारी (ता. एक) सायंकाळी पाचच्या सुमारास केली. लिंबगाव पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने ता. सहा आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

जिल्ह्यातील व शहरातील पाहिजे व फरार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीमधील आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिल्या. शहरातील काही सराईत गुन्हेगार पोलिसांना चकमा देऊन फरार आहेत. तर अनेकजण पोलिसांच्या वाढत्या कारवाया पाहता भूमीगत झाले आहेत. 

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, खरीप हंगाम बहरला

लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यांचे पथक भवानी चौक कॅनाल रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन श्री. भारती यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊ न ते लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली मोठी गुन्हेगारांची टोळी (गॅंग) तिथे एका पुलाखाली दबा धरुन बसल्याची खात्रीशिर माहिती श्री. भारती यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी अतिशय शिताफीने या गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल या गुन्हेगारांना लागली.

दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक

पोलिस दिसताच यातील सर्व ११ जण चार दुचाकीवरुन पसार झाले. मात्र पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यातील दोघांना ताब्यात घेतले. परंतु नऊ जण पसार झाले. ताब्यात घेतलेल्या निखील नागेश चोंचेकर (वय १९) रा. जुना कौठा आणि माधव चंपतराव नंदनकर (वय २४) रा. शिवनगर नांदेड यांची कसुन तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडून एक पिस्तुल, एक खंजर आणि चोरीची दुचाकी असा ५० हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त केला. रात्री उशिरा लिंबगाव पोलिस ठाण्यात एपीआय पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन दरोडा आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड करत आहेत. 

येथे क्लिक करा - या कारणासाठी सख्या भावानेच भावाला टाकले संपवूवन

हे आहेत पथकातील कर्मचारी

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती आणि त्यांचा सहकारी सहाय्यक फौजदार शेख अब्दुल रब, जसवंतसिंग शाहू, हवालदार मारुती तेलंगे, पोलीस नाईक सखाराम नवघरे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, राजू पुल्लेवार यांनी सापळा लावून या आरोपींना अटक केली. पुढील कारवाईसाठी या दोन्ही आरोपींना लिंबगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्हेगारांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता श्री भारती यांनी व्यक्त केली आहे. पथकाचे पोलिस अधीक्षक श्री. मगर यांनी कौतुक केले.