esakal | दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; ३३ दुचाकी जप्त, तिघांना अटक, स्थागुशा नांदेडची कारवाई- प्रमोदकुमार शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्री शेवाळे यांनी आपल्या यंत्रणेला दिल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतर्क करुन दुचाकी चोरांना पकडण्याच्या सुचना दिल्या. 

दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; ३३ दुचाकी जप्त, तिघांना अटक, स्थागुशा नांदेडची कारवाई- प्रमोदकुमार शेवाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हाभरातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरांच्या एका टोळीला अटक केले. त्यांच्याकडून १४ लाख ८५ हजाराच्या ३३ दुचाकी जप्त केल्या आहेत. यापूर्वीही दुचाकी चोरांचा पोलिसांनी अड्डा उध्वस्त करुन जवळपास शंभर दुचाकीचे सुटे भाग जप्त केले होते. अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गुरुवारी (ता. चार) सायंकाळी पाच वाजता आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड शहरात व परिसरातून गर्दीच्या ठिकाणी, आठवडी बाजार, माॅल्स, चित्रपटगृह, बाजारपेठेमध्ये लावलेली दुचाकी मालकांची नजर चुकवत हातोहात लंपास करणारी टोळी सक्रीय झाली आहे. शहरात चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्री शेवाळे यांनी आपल्या यंत्रणेला दिल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतर्क करुन दुचाकी चोरांना पकडण्याच्या सुचना दिल्या. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार अशिष बोराटे, प्रवीण राठोड यांच्या पथकाने दोन मार्च रोजी नांदेड शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा मोरक्या जेरबंद केला. त्याचे नाव सरवर शेरखान पठाण रा. चिखली ता. कंधार असे आहे. शेरखान पठाण याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांचे नाव सांगितले. त्यात चिखली तालुका कंधार येथील मीरसाब उर्फ चाऊस अब्दुल शेख (वय २४) आणि गोविंद दिगांबर कदम (वय २०) यांनाही ताब्यात घेतले. या तिघांकडून चोरलेल्या अगोदर तीन दुचाकी जप्त केल्या.

पोलिसी हिसका दिसताच या तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या जवळपास ३३ दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. चिखली गावातून पोलिसांनी पंचवीस दुचाकी, मारतळा येथून एक, अहमदपूर येथून तीन, कलंबर येथून एक, नांदेड शहरातून दोन, नरसी येथून एक अशा ३३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची किंमत जवळपास १४ लाख ८५ हजार रुपये असल्याचे श्री शेवाळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे यांची उपस्थिती होती.

loading image