esakal | नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे गुरूवारी होणार दरवाजे बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

बाभळी बंधारा

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीवर असलेल्या बांभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गुरूवारी (ता. २९ आॅक्टोंबर) सकाळी सहा वाजता बंद करण्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे गुरूवारी होणार दरवाजे बंद 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीवर असलेल्या बांभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गुरूवारी (ता. २९ आॅक्टोंबर) सकाळी सहा वाजता बंद करण्यात येणार आहेत.

दरम्यान, यंदाच्या वर्षी मराठवाड्यासह इतर भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे तब्बल १७० टीएमसी पाणी तेलंगणात सोडून द्यावे लागले. तेलंगणा सरकारने परवानगी दिली असती तर २.७४ टीएमसी पाणी बाभळी बंधाऱ्यात साठले असते आणि त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झाला असता अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र शासनाने १९९५ मध्ये बाभळी बंधाऱ्याच्या प्रकल्पास मान्यता दिली. त्यानंतर प्रत्यक्ष बंधाऱ्याचे काम प्रारंभ होण्यास या भागातील जनतेला व बाभळी बंधारा कृती समितीने जवळपास दहा वर्षे संघर्ष केल्यानंतर बंधाऱ्याचे काम सुरू झाले. दरम्यान, त्यावेळच्या आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पार्टी आणि त्याचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या आडमुठे धोरणामुळे पुन्हा काम बंद पडले. बाभळी बंधारा हा महाकाय प्रकल्प आहे, असा चुकीचा समज करून केवळ राजकारणासाठी राजकारण करणाऱ्या तत्कालीन आंध्र प्रदेशातील पुढाऱ्यांमुळे बाभळी बंधाऱ्यांचे काम रखडले व सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले. 

हेही वाचा - रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. विपीन इटनकर

२०१३ मध्ये झाले लोकार्पण
हे प्रकरण सात वर्षे चालले आणि शेवटी ता. २८ फेब्रुवारी २०१३ ला न्यायालयाने आंध्र प्रदेशाची मागणी फेटाळून महाराष्ट्राला काही अटी व नियमांच्या अधीन राहून बाभळी बंधारा बांधून तो कार्यान्वित करण्याची परवानगी दिली. दरम्यानच्या, काळात बाभळी बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास जाऊन ता. २९ ऑक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तसेच अशोक चव्हाण, अजित पवार आदींच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी : ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

 
बाभळी बंधाऱ्याची माहिती
 
बाभळी बंधाऱ्यांची साठवण क्षमता २.७४ टीएमसी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी ता. २९ आॅक्टोंबर रोजी बंधाऱ्याचे गेट बंद करण्यात येणार आहेत आणि ता. एक जुलै रोजी उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, ता. एक मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी बंधाऱ्यातून गेट उघडून बंधाऱ्यातून तेलंगणात सोडण्यात येणार असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली. 

जनतेच्या भावनांना न्याय द्यावा
तब्बल सात वर्षांपूर्वी बाभळी बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा झाला असून या बंधाऱ्याचा लाभ हा धर्माबाद, बिलोली, उमरी व नायगाव तालुक्यातील गावांना होणार आहे. मात्र, असे असले तरी त्या दिशेने राज्य शासनाने कोणतीच पावले उचलली नाहीत. बाभळी बंधाऱ्यांच्या पाण्याचा विनियोग आजतागायत फारसा झाला नसल्याने भविष्यात विनियोग करण्यासंदर्भात तत्काळ कृती आराखडा तयार करावा. तसेच तो अंमलात आणण्यासाठी विशेष अर्थसहाय्य सरकारने मंजूर करावे. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन जनतेच्या भावनांना न्याय द्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. 
- राजेश पवार, आमदार.