शंकरनगर येथील ‘त्या’ अत्याचार पिडीत मुलीस मिळाला हक्काचा निवारा

प्रल्हाद कांबळे
Friday, 30 October 2020

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने सांगवी (बु) परिसरातील गौतमनगर येथील बीएसयुपी योजनेतील ए- ४ इमारतीमधील घर क्रमांक २०३ चा ताबा महापौर मोहीनी यवनकर यांच्या हस्ते देण्यात आला.

नांदेड : शंकरनगर (ता. बिलोली) येथील ‘त्या’ अत्याचार पिडीत अल्पवयीन मुलीस अखेर सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हक्काचे घर मिळाले. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने सांगवी (बु) परिसरातील गौतमनगर येथील बीएसयुपी योजनेतील ए- ४ इमारतीमधील घर क्रमांक २०३ चा ताबा महापौर मोहीनी यवनकर यांच्या हस्ते देण्यात आला. पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुनर्वसन करण्यासाठी समाजकल्याण विभागाने हे प्रकरण महापालिकेकडे वर्ग केले होते. 

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर शाळेतील नराधम दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी ता. १७ जानेवारी रोजी रामतीर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्व आरोपींना अटक करुन त्यांना कारागृहात दाखल केले होते. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्यांच्यापासून पिडीत व तिच्या कुटंबियांना भिती वाटत होती. त्या कुटुंबाचे शहरात पुनर्वसन करावे अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि डॉ. विपीन यांनी दिलेल्या सुचनेवरुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. काळम यांनी पाठपुरावा केला. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे व महिला सहाय्य कक्षाच्या समुपदेशक सुचित्रा भगत यांनी पिडीत बालिकेचे व तिच्या आईचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पिडीत बालिका व तिचा भाऊ यांना बालसंगोपन योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. 

हेही वाचा -  चंद्र आहे साक्षीला : कोजागिरी पौर्णिमा आरोग्यासाठी आहे फलदायी -

निंदनीय कृत्याने संबंध महाराष्ट्रासह नांदेड जिल्हा हादरला होता

शिक्षक हे धनदांडगे असल्यामुळे पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याने त्यांचे नांदेड येथे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे आणि घरकुल देण्यात यावे अशी विविध संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली होती. पीडित मुलीस व तिच्या कुटुंबीयांना नांदेड येथे घरकुल देण्यात आले आहे. शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात त्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर संबंध जिल्हाभरात संतापाचे वातावरण पसरले होते. शिक्षक सय्यद रसुल आणि दयानंद वांजळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून शिक्षक व शिष्य या पवित्र नात्याला काळीमा फासली होती. याप्रकरणी वरील दोघांसह अन्य तीन जण अशा पाच जणांविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ता. १७ जानेवारी २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. या अमानवीय व संतापजनक तथा निंदनीय कृत्याने संबंध महाराष्ट्रासह नांदेड जिल्हा हादरला होता.

येथे क्लिक करा - ‘स्वारातीम’ विद्यापीठ परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

त्यांना हक्काचे सुरक्षीत निवासस्थान मिळाले

पीडित मुलीस मानसिक व शारीरिक धक्का बसला होता. पीडित मुलीचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देऊन शिक्षणाची सोय करावी, पीडित मुलीच्या आईची दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेअंतर्गत निवड करावी, चतुर्थश्रेणी या पदावर नियुक्ती करावी यासह आदी मागण्या विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. अखेर त्या पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करुन त्यांना हक्काचे सुरक्षीत निवासस्थान मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl victim of 'that' atrocity in Shankarnagar got the right shelter nanded news