चंद्र आहे साक्षीला : कोजागिरी पौर्णिमा आरोग्यासाठी आहे फलदायी

File photo
File photo

नांदेड : निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी। जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।। तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।। या श्लोकाप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोजागीरी ही वैज्ञानिक दृष्टीकोणातून आरोग्यासाठी फलदायी असल्याचे मानले जाते. 

दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. आज, शुक्रवार शरद म्हणजेच कोजागरी पोर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच आपल्याला माहित असते.   

कोजागीरी पौर्णिमा म्हणजे काय?
कोजागिरी हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.

चंद्राच्या प्रकाशात असते शक्ती
या दिवशी शेतकरी नवीन पिकवलेल्या धान्याचे जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. चंद्राला नैवेद्य दाखवून एकत्रित ते ग्रहण करतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करण्याची परंपरा आहे. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते, असे म्हटले जाते. या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळांसोबतच गाण्यांची मैफिलीचेही आयोजन केले जाते.  

कोजागीरीच्या दिवशी का करतात जागरण?
लक्ष्मी आणि इंद्र या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आवाहन करतो. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते, अशी अख्यायिका असल्यामुळे कोजागिरीच्या रात्री जागरण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com