राज्य विधानपरिषदेवर मातंग समाजाला न्याय द्या- ॲड. घोडजकर 

file photo
file photo

नांदेड : महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी होणाऱ्या राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्याची नियुक्ती करताना मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते तथा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव ॲड. सुरेंद्र धनाजीराव घोडजकर यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्य विधानपरिषदेवर मातंग समाजाला आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळाले नाही. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत क्रमांक दोनवर असलेल्या मातंग समाजाला आतापर्यंत एकदाही विधानपरिषदेवर नियुक्ती मिळालेली नाही. हा मातंग समाजावरचा राजकीय अन्याय आहे. अगोदरच मातंग समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मागासलेला आहे.

हे वर्ष साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 

या मागासलेल्या समाजाचा सर्व क्षेत्रात विकासात्मक दर्जा उंचावण्याकरिता राज्य विधानपरिषदेवर संधी मिळणे आवश्यक आहे. हे वर्ष साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, या वर्षामध्ये मातंग समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा, त्यांच्या संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ व कामगार चळवळीतील योगदानाचा यथोचित सन्मान होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

मातंग समाजातील कोणत्याही एका व्यक्तीस न्याय द्यावा 

सदर पदावर मातंग समाजाच्या एखाद्या नेत्याची निवड झाल्यास मातंग समाजामध्ये मागासवर्गीयांकरिता झटणारे व सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे, उच्च विद्याविभुषित सामाजिक व सार्वजनिक समस्यांची जाण असलेले, विविध क्षेत्रामध्ये अभ्यासू व अनुभव असणारे मातंग समाजाचे अनेक नेते महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मातंग समाजातील कोणत्याही एका व्यक्तीस राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व द्यावे, असेही ॲड. सुरेंद्र घोडजकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

खासदार प्रताप पाटील यांनी टाकलेला विश्र्वास सार्थ करून दाखवा

नांदेड- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण साले यांनी सर्वात जास्त व महत्त्वाची पदे सिडको मंडळातील कार्यकत्यांना देऊन जो विश्र्वास दाखविला तो जोमाने काम करून सार्थ ठरवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा सिडको मंडळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ठाकूर बोलत होते.

जनतेच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याचे आवाहन 

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष शीतल खांडील, सचिव चंचलसिंग जट, सिध्दार्थ धुतराज, व्यापारी आघाडी अध्यक्ष सचिन रावका, विमुक्त भटके आघाडी अध्यक्ष नरेंद्रसिंह बैस, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख धिरज स्वामी यांचा शाल व पुष्पहार देऊन ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना जनार्दन ठाकूर शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करणे आणि जनतेच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळ प्रमुख वैजनाथ देशमुख हे होते. त्यांचा प्रथम सत्कार केला. सूत्रसंचालन धिरज स्वामी यांनी केले, तर आभार गोविंद सिरसाठ यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com