नांदेडकरांना सोमवारी साखर झोपेतच धक्का, सहा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

नांदेडकर साखर झोपेतच असतांना सोमवारी (ता. १५) पहाटे सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये पाच रुग्ण मुखेडमधील तर एक रुण नांदेड शहरातील आहे. आता सख्या पोहचली आहे २६२ वर.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात रविवार ता. १४ जून रोजी सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात एकही स्वॅब पॉझिटिव्ह न आल्याने नांदेड जिल्हावासीयांनी मोठा दिलासा मिळाला होता. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील सहा बाधित व्यक्ती व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील दोन बाधित तसेच कोविड केअर सेंटर माहूर येथील एक असे नऊ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. मात्र नांदेडकर साखर झोपेतच असतांना सोमवारी (ता. १५) पहाटे सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये पाच रुग्ण मुखेडमधील तर एक रुण नांदेड शहरातील आहे. आता सख्या पोहचली आहे २६२ वर. 

रविवारी प्राप्त झालेल्या ९८ अहवालापैकी ९४ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. चार अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे. सद्यस्थितीत ६६ बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील तिन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण १३ आहे.

हेही वाचा -  शेतशिवारांनी नेसला हिरवा शालु

अनेकांचा अहवाल प्राप्त होणार 

नांदेड जिल्ह्यात ६६ बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे दोन बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार ता. १४ जून रोजी १३५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होणार होता. 

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- एक लाख ४८ हजार ५१,
घेतलेले स्वॅब पाच हजार १९,
निगेटिव्ह स्वॅब चार हजार ३४७,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २६२,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १९१,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८३,
मृत्यू संख्या १३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या १७७,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ६६,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची १३५ एवढी संख्या आहे.

येथे क्लिक कराVideo - कोरोनाबाधिताच्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी ‘हॅपी क्लब’चा पुढाकार...

जनतेने सहकार्य करावे

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkar hit by in his sleep on monday, six positive nanded news