गो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Wednesday, 28 October 2020

बुधवारी (ता. २८) एक हजार ७२२ नवीन स्वॅब अहवाल प्राप्त झाले. या मध्ये एक हजार ५८३ निगेटिव्ह आले तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ९५६ इतकी झाली आहे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. नवीन ९४ बाधितांची भर पडली आहे. मागील २४ तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात सध्या ७०७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

मंगळवारी (ता. २७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता. २८) एक हजार ७२२ नवीन स्वॅब अहवाल प्राप्त झाले. या मध्ये एक हजार ५८३ निगेटिव्ह आले तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ९५६ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी बुधवारी सायंकाळपर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाने देखील समाधान व्यक्त केले असून, पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५०४ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड : दामिनी पथकाची धाडशी कारवाई, अट्टल गुन्हेगार जेरबंद ​

आतापर्यंत १७ हजार ६१६ रुग्ण कोरोनामुक्त 

बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील चार, जिल्हा रुग्णालयातील १३, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशनमधील ५५, देगलूर - एक, अर्धापूर - एक, मुखेड - दोन, उमरी - दोन, भोकर - पाच, किनवट - सहा, माहूर - एक, मांडवी - आठ व खासगी कोविड सेंटरमधील २० असे ११८ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १७ हजार ६१६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत ​

३६ जणांची प्रकृती गंभीर 

मंगळवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व ॲन्टीजेन टेस्ट किटचा बुधवारी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ७४, नांदेड ग्रामीण - पाच, कंधार - दोन, भोकर - एक, अर्धापूर - तीन, मुखेड - तीन, बिलोली - दोन, धर्माबाद - दोन, देगलूर - एक व औरंगाबाद - एक असे ९४ बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत १८ हजार ९५६ बाधितापैकी १७ हजार ६१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७०७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी उशीरापर्यंत ४७९ 
स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १८ हजार ९५६ 
आज बुधवारी पॉझिटिव्ह - ९४ 
एकुण कोरोनामुक्त - १७ हजार ६१६ 
आज बुधवारी कोरोनामुक्त - ११८ 
एकुण मृत्यू - ५०४ 
आज बुधवारी मृत्यू - शून्य 
सध्या उपचार सुरु - ७०७ 
सध्या गंभीर रुग्ण - ३६ 
स्वॅब प्रतिक्षेत - ४७९ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go Corona Go - Treatment started on 707 patients in Nanded district On Wednesday, 118 corona-free and 94 positive reports Nanded News