चांगली बातमी : नांदेड विभागात ३७ लाख टन उसाचे गाळप; ३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

कृष्णा जोमेगावकर, प्रल्हाद कांबळे
Sunday, 10 January 2021

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२० - २०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २४ साखर कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी बुधवारअखेर (ता. सहा) ३७ लाख टन उसाचे गाळप केले तर ३४ लाख ३२ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२० - २०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. आजपर्यंत २४ कारखान्यांनीच गाळप सुरु केले आहे. यात आठ सहकारी तर १६ खासगी कारखान्याचा समावेश आहे. या २४ कारखान्यांनी बुधवारअखेर (ता. सहा) ३७ लाख ७९ हजार ४१८ टन उसाचे गाळप केले आहे. तर यापासून ३४ लाख ३२ हजार १५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.०८ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

हेही वाचाGram Panchayat Election : साहेबांचे लक्ष्मी दर्शन ठरतेय स्थानिक पदाधिकाऱ्यांना डोकेदुखी

गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण, एमव्हीके वाघलवाडा, शिवाजी शुगर बाऱ्हाळी, हडसणी येथील सुभाष शुगर लिमिटेड, कुंटूरकर शुगर्स लिमीटेड, कुंटूर व व्यंकटेश्वरा शुगर, शिवणी या कारखान्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यामधील भाऊराव चव्हाण, डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, कपिश्वर शुगर बाराशिव, टोकार्इ कारखाना कुरुंदा, शिऊर साखर कारखाना वाकोडी तसेच परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, गंगाखेड शुगर, टेवन्टीवन शुगर सायखेडा, योगेश्वारी शुगर लिंबा, रेणुका शुगर पाथरी, त्रिधारा शुगर अमडापूर हे कारखाने सुरु झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी कारखाना लातूर, मांजरा सहकारी कारखाना विलासनगर, विलास सहकारी तोंडार, रेणा, जागृती, साईबाबा, टेवन्टीवन हे कारखाने सुरु झाले आहेत.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनात तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा - कारखाने - ऊस गाळप - साखर उत्पादन
नांदेड - सहा - ७, ८६, १०५ - ७, १०, २९०
लातूर - सात - १३, ०५, ०१० - ११, ५६, ७६०
परभणी - सहा - १०, ६०, ३३७ - ९, ५८, ७१५
हिंगोली - पाच - ६, २७, ९६६ - ६, ०६, २५०
एकूण - २४ - ३७, ७९, ४१८ - ३४, ३२,०१५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: 3.7 million tonnes of sugarcane crushed in Nanded division nanded sugar factory news