Good news : अकोला- अकोट स्थानकादरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 28 July 2020

अकोला- खांडवा ही १७५ किलोमीटरची मीटरगेज लाईन ब्रॉडगेज परिवर्तन करण्याकरिता इ. स. २००८- ०९ मध्ये २०६७ कोटी रुपये अंदाजित खर्चाने मंजूर करण्यात आली

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अकोला ते खांडवा मीटरगेज रेल्वे लाईनचे  ब्रॉडगेज परिवर्तन करण्याचे शिल्लक होते.  भारतीय रेल्वेच्या युनी गेज परिवर्तन संकल्पनेतून ही मीटरगेजची लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचे ठरविण्यात आले आहे. अकोला- खांडवा ही १७५ किलोमीटरची मीटरगेज लाईन ब्रॉडगेज परिवर्तन करण्याकरिता इ. स. २००८- ०९ मध्ये २०६७ कोटी रुपये अंदाजित खर्चाने मंजूर करण्यात आली. हे गेज परिवर्तनाचे कार्य दक्षिण मध्य रेल्वेचेलबांधकाम विभाग करत आहे.

हे १७५  किलोमीटर चे कार्य तीन टप्यांत करण्यात येत आहे
१. अकोला- अकोट- ४४ कि.मी.
२. अकोट- अमलाखूर्द- ७७ कि.मी.
३. अमलाखूर्द- खांडवा- ५४ कि.मी.

यातील पहिल्या टप्प्यातील अकोला ते अकोट या ४४ किलोमीटर मीटरगेज रेल्वे लाईनचे परिवर्तन ब्रॉडगेजमध्ये करण्यात येऊन ही ४४ किलोमीटर ब्रॉड गेज लाईन रेल्वे गाडी चालविण्याकरिता अधिकृत रित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. 

हेही वाचा -  हरहर महादेवच्या घोषणेला कोरोनाचे ग्रहण, श्रावण सोमवार काळेश्वर मंदीर भक्ताविना....

या ४४ किलोमीटरच्या रेल्वे भागाचे ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे आहेत

·३८ छोटे रेल्वे पूल आणि दोन मोठे रेल्वे पूल या विभागात बांधण्यात आलेत. याशिवाय आणखी एक मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला.
·पाच रेल्वे स्थानक नव्याने बांधण्यात आलीत. या नवीन रेल्वे स्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत.
·२२ रेल्वे गेट जे मीटर गेज दरम्यान उपलब्ध होते, त्या सर्व २२ रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी पूल बांधण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवाशी सुविधेत वाढ झाली आहे. या भुयारी पुलामुळे रोड प्रवास अखंडपणे सुरु ठेवता येईल.
·अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या तीन लाईन (एक मेन लाईन आणि दोन लूप लाईन ) सोबत चौथी लूप लाईन टाकण्यात आली आहे.  

हे गेज परिवर्तनाचे महत्वपूर्ण कार्य पूर्ण 

दक्षिण मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी हे गेज परिवर्तनाचे महत्वपूर्ण कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. गजानन माल्या यांनी या महत्वाच्या कार्यपूर्तीनंतर अशा अपेक्षा व्यक्त केल्या की हे अकोला ते खांडवा गेज परवर्तनाचा हिस्सा असलेले अकोला- अकोट ब्रॉडगेजचे कार्य पूर्ण झाल्यामुळे अकोला येथून खांडवाला जाण्याकरिता सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होईल. तसेच हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भला मध्यप्रदेश सोबत जोडण्यात अतिशय महत्वाचा ठरेल.
गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news: Broad gauge line operation between Akola-Akot station nanded news