
या गुणी खेळाडूचे तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंग होण्याची शक्यता होती. याबाबत साईप्रसादला माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पावणेदोन लाख रुपये भाग्यश्रीचा खात्यात जमा करुन तिला मदत दिली.
नांदेड : नायगाव तालुक्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि दोन्ही पायांनी अपंग असलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव या खेळाडूची दुबईत होणाऱ्या फाज्जा बोल्ड पॅराअॅथेलीटिक या स्पर्धेत भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. परंतु स्पर्धेला जाण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तिच्याकडे नव्हते. त्यामुळे या गुणी खेळाडूचे तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंग होण्याची शक्यता होती. याबाबत साईप्रसादला माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पावणेदोन लाख रुपये भाग्यश्रीचा खात्यात जमा करुन तिला मदत दिली.
शनिवारी (ता. सहा) ऑलिंपिकसाठी भाग्यश्री दुबईला रवाना झाली. भाग्यश्रीचे वडील अंथरुणाला खिळून आहेत, तर भाऊ एका दुकानामध्ये काम करतो. घरी जेमतेम दोन एकर शेती आहे. एकट्या भावाच्या उत्पन्नावर घर चालते. त्यात भाग्यश्रीला पॅराओलंपिकला जाण्यासाठी चार लाख रुपयांची आवश्यकता होती. मित्रमंडळी, ओळखीच्या व्यक्तीकडून एक लाख रुपये गोळा झाले होते. परंतु आणखी तीन लाखांची आवश्यकता होती. स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. त्यामुळे पॅराऑलिम्पिकला जाता येणार नाही अशी चिंता सतावत होती. त्यात भाग्यश्रीने साईप्रसादकडे मदतीचा हात मागितला.
साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आवाहन केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पावणे दोन लाख रुपयांची मदत गोळा झाली. ही सर्व रक्कम भाग्यश्रीच्या खात्यात जमा करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील भाग्यश्रीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने इथपर्यंत पल्ला गाठला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील तिची संधी चुकू नये यासाठी साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. त्यामुळे भाग्यश्री चे प्यारा ऑलिम्पिकला जाण्याचे स्वप्न आता साकार झाले.