Good news:नांदेडला डीएनए आणि सायबर चाचणी शक्य- पालकमंत्री अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 21 July 2020

अशोक चव्हाण यांनी रखडलेल्या कामांना वेगाने चालना दिली असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत आता डीएनए चाचणी आणि सायबर (संगणक) गुन्हे विभाग सुरू होणार आहे.

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी रखडलेल्या कामांना वेगाने चालना दिली असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत आता डीएनए चाचणी आणि सायबर (संगणक) गुन्हे विभाग सुरू होणार आहे.

सदरहू प्रयोगशाळेत डीएनए चाचणी तसेच सायबर गुन्हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडलेला होता. हे दोन्ही विभाग सुरु करण्यासाठी सुमारे पाच हजार चौरस वर्ग फूट जागेची आवश्यकता होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा -  लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार  

डीएनए चाचणी विभाग आणि संगणक गुन्हे विभागासाठी जागा देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मान्य झाल्याने लवकरच हे दोन्ही विभाग कार्यरत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेडच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सुरु होणाऱ्या या दोन्ही विभागांमुळे संबंधित कार्यवाही गतीमानतेने होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले असून, या विभागांसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत. 

मागील सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू 

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी पायाभूत सुविधांबाबतचे रखडलेले अनेक निर्णय वेगाने मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. प्रलंबित प्रस्तावांच्या पूर्ततेसाठी कार्यवाहीला वेग देण्यात आला असून, नव्या इमारतींची उभारणी तसेच जिल्ह्यात नवी कार्यालये, नवी पदे निर्माण करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नांदेड येथील न्यायालयाची इमारत, कौटुंबिक न्यायालयाला जागा उपलब्ध करून देणे यासह अनेक विषय पालकमंत्र्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. त्याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून आता डीएनए चाचणी व संगणक गुन्हे विभागासाठीही जागा उपलब्ध झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: DNA and cyber testing possible in Nanded- Guardian Minister Ashok Chavan nanded news