esakal | चांगली बातमी : स्वतः च्या शेतातच फळांचा केक बनवून शेतकऱ्याच्या मुलाचा वाढदिवस...!

बोलून बातमी शोधा

file photo

यानिमित्ताने शेतकऱ्यांचा एक नवीन प्रयोग पुढे येत असून शेतीशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठीही एक चालना मिळणार आहे.

चांगली बातमी : स्वतः च्या शेतातच फळांचा केक बनवून शेतकऱ्याच्या मुलाचा वाढदिवस...!
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे बाजारातील केकवर शंका उपस्थित केली जात आहे. त्याला एक चांगला पर्याय शेतकऱ्याने शोधला. स्वतः च्या शेतातच फळांचा केक बनवून मूलाचा वाढदिवस साजरा करण्याची शक्कल लढवत शेत शिवारातील फळांना महत्व प्राप्त करुन दिले आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा एक नवीन प्रयोग पुढे येत असून शेतीशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठीही एक चालना मिळणार आहे.

अन फळांच्या केकची क्रेझ...!

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतीतील पिके संकटात सापडली. मागणी अभावी शेतकऱ्यांना शेतातील फळे व भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कुठलाही आधार नाही. तरीही शेतकरी न थकता न थांबता आपले काम सुरुच ठेवत असतो. शेतीतही नवनवीन प्रयोग सुरुच असतात. नांदेड शहरातील विठोबा परिवाराच्या सविता पावडे यांचा यापूर्वी फळांचा केक कापून वाढदिवस साजरा करुन एक चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर फळांच्या केकची क्रेझ सुरु झाली होती.

हेही वाचासाहेब ! वेळेचा निर्बंध लावा परंतु लाॅकडाउन नको; व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर साकडे

कोरोनामुळे बच्चेकंपनीच्या वाढदिवसावरही संकट....!

कोरोना काळात वाढदिवसासह सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. त्यात लहान मुलांना मात्र वाढदिवसाची उत्सुकता असते. गतवर्षीही कोरोनाच्या संकटामुळे या बच्चेकंपनीला आपला वाढदिवस साजरा करता आला नव्हता. यावर्षीही गतवेळेपेक्षा परिस्थिती अडचणीचीच आहे. पण मुलांचे हट्ट मात्र कायम सुरूच असतात. ते पुरवण्यासाठी आई- वडिलही कुठेच कमी पडताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील शेतकरी गजानन भांगे पाटील मूलाचा हट्ट पुरविण्यासाठी शेतातच वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतर प्रश्न उभा होता तो केकचा? कोरोनाच्या संकटात बाजारातून केक कसा आणायचा?  फास्टफूड केकला पर्याय शोधत त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी फ्रूट केकचा पौष्टिक आणि रसरशीत मार्ग अवलंबविण्याचे ठरविले. 

शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा अभिमान.....!

स्वतः च सर्व फळांची उत्कृष्ट व आकर्षकअशी मांडणी करुन केक तयार केला. यात टरबूज, खरबूज, सफरचंद  व द्राक्षांचा वापर केला. हॉटेल, गार्डन किंवा इतरत्र वाढदिवस साजरा ना करता शेतीला व कृषी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शेत- शिवारात हा वाढदिवस व्हावा यासाठी माझ्या वडिलांनी ही संकल्पना राबविली. यापेक्षा मोठेही वाढदिवस होतील. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान असून हा माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण असेल अशी प्रतिक्रिया बर्थडेबाॅय केदार भांगे याने दिली.

फ्रूट केकचा पौष्टिक आणि रसरशीत मार्ग.....!

कोरोना काळात फास्टफूडला पर्याय शोधणाऱ्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी फ्रूट केकचा पौष्टिक आणि रसरशीत मार्ग सापडला. ग्रामीण, शहरी भागातून फळांची आकर्षक मांडणी करणारे केक लोकप्रिय ठरु लागतील. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या मालाला किमत मिळून तेवढेच सहकार्य मिळेल. शेतकऱ्यांनी बनविलेले कलात्मक केक हे भविष्यातील ग्राहकांचे आकर्षण ठरावे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असल्याने अनेकांच्या ते पसंतीस पडतील यात शंका नाही. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नाते जोडून उद्योग- व्यवसायाचे स्वप्न पाहणाऱ्‍या तरुण होतकरु उद्योजकांसमोर एक नवी संधी उपलब्ध होणार आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यानी व्यक्त केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे