आनंदाची बातमीः मुगाच्या मुहूर्ताला देगलूरमध्ये ८२५१ रुपये भाव

अनिल कदम
Monday, 31 August 2020


मुगाला सर्वोच्च असा ८२५१ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. तर पाणी लागून डागी झालेल्या मुगाला ३५५२ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. केंद्र शासनाने खरीप हंगामातील पिकाचे हमीभाव नुकतेच जाहीर केले असून मुगाला प्रतिक्विंटल सात हजार १९६ रुपये भाव तर उडीद प्रति क्विंटल सहा हजार रुपये तूर सहा हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी केली जाणार आहे.

देगलूर, (जि. नांदेड) ः खरीप हंगामातील या वर्षीचा पहिला मुहूर्त सोमवारी (ता.३१) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात करण्यात आला. मुगाला सर्वोच्च असा ८२५१ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. तर पाणी लागून डागी झालेल्या मुगाला ३५५२ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. केंद्र शासनाने खरीप हंगामातील पिकाचे हमीभाव नुकतेच जाहीर केले असून मुगाला प्रतिक्विंटल सात हजार १९६ रुपये भाव तर उडीद प्रति क्विंटल सहा हजार रुपये तूर सहा हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी केली जाणार आहे.

नक्षत्रातील पाण्याने मुगाची दैना
या वर्षी तालुक्यातील प्रत्यक्ष पेरणी झालेल्या ५८१७९ हेक्टर क्षेत्रापैकी ५३७७ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी करण्यात आली होती. खानापूर मंडळात मुगाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली, तर सर्वात कमी पेरणी शहापुर मंडळात करण्यात आली होती. कधी नाही ते मृग नक्षत्रात पेरण्या झाल्याने मूग पीक चांगले बहरले होते. काढणीच्या दिवसातच (ता.१६) ऑगस्टपासून सुरू झालेल्या मेघ नक्षत्रातील पाण्याने मुगाची दैना उडविली.

हेही वाचा -  राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपुस- कोणी केली ते वाचा ? -

५२३ क्विंटल मुगाची तोलाई
मूग काढण्यापेक्षा त्याची मजुरीच जास्त होत होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुगाच्या पिकात जनावरे सोडली तर काहींनी त्यावर नांगर फिरविला. दररोजच्या जेवणात मुगाच्या डाळीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता सर्वसामान्यांना या वर्षी मुगाची डाळ मिळते का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (ता.३१) रोजी येथील मोंढ्यात मुगाचा मुहूर्त झाला. चांगल्या प्रतीच्या मुगाला सर्वोच्च असा ८२५१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर पाणी लागलेल्या मुगाला ३५५२ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. सोमवारी ५२३ क्विंटल मुगाची तोलाई मोंढ्यात करण्यात आली. तर एक हजार क्विंटलच्यावर मुग बाजारपेठेत आला होता. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश मेरगेवार, लिपिक कल्याणी खानापूरकर, चैनपुरे यांच्यासह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बुधवारी (ता.दोन) सप्टेंबर रोजी उडीदाचा मुहूर्त केला जाणार असल्याची माहिती या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

प्रशासकांनी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे
कृषी उत्पन्न बाजार समिती चा परवाना न घेता काही भुसार व्यापाऱ्यांनी शहराच्या सभोवताली शेतकऱ्यांना आडवून मालाची खरेदी करीत असल्याने त्यांना हमीभाव मिळेल का नाही हे सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे अशा व्यवहारावर बाजार समितीने निर्बंध लादण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवीन प्रशासकांनी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Good News : Mug Is Priced At Rs 8,251 In Deglaur, Nanded News