नांदेडकरांसाठी गुड न्यूज : कोरोना मृत्यूदर घटला, मात्र संकट टळले नाही

प्रल्हाद कांबळे
Thursday, 8 October 2020

रुग्णसंख्या जरी वाढली तरी मृत्यूदर रोखण्यास प्रशासनाला यश आले. कोरोना प्रादुर्भावामुळे ७. २ टक्क्यावर पोहोचलेला मृत्युदर आता २. ५४ टक्क्यावर आला आहे.

नांदेड : मागील आठ महिण्यापासून जिल्ह्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. या आजाराचा प्रादूर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. लॉकडाउनचा पर्याय वापरुन नांदेडकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव बाहेर राज्यातून, देशातून आणि जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे वाढत गेला. रुग्णसंख्या जरी वाढली तरी मृत्यूदर रोखण्यास प्रशासनाला यश आले. कोरोना प्रादुर्भावामुळे ७. २ टक्क्यावर पोहोचलेला मृत्युदर आता २. ५४ टक्क्यावर आला आहे. मे महिन्यात उच्च पातळीवर पोहोचलेल्या कोरोना मृत्यूला नियंत्रित करण्यात जिल्ह्यातील ऑक्सिजनची उपलब्धता आणि गृहविलगीकरणातून रुग्णांचा वाढलेला आत्मविश्वास या बाबी कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात पहिला रुग्ण हा एप्रील महिण्यात पिरबुऱ्हाननगर परिसरात आढळला होता. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले. तेथून पुढे हळुहळू हा संसर्ग वाढत गेला. आजही कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन फ्रन्ट लाईनवर लढत आहे. स्वत: जिल्हाधिकारी कोरोना बाधीत झाले तरीसुद्धा त्यांनी आपली प्रशासनावरील पकड कमी होऊ दिली नाही. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक घटक, पोलिस, महापालिका आणि आरोग्यविभाग आपल्या कर्तव्यात कमी पडले नाहीत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ८२. ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे देशात आता १. ४० टक्के इतके आहे. तर राज्याचा मृत्यूदर हा २. ५० टक्‍क्यावर आला आहे. नांदेड जिल्ह्याचे हे प्रमाण २. ५४ टक्के इतके आहे.

हेही वाचा -  प्रत्येक गावात स्मशान व दफनभूमीसाठी पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार

आकडे बोलतात

शेजारील जिल्हा असलेल्या लातूरचा मृत्यूदर २. ८३ टक्के, बीड २. ८५ टक्के आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या मृत्यूदर ३.०८ टक्के आहे तसेच हिंगोली आणि परभणीचा मृत्यूदरही कमी आहे. नांदेडचा मृत्यू दर पाहता मेमध्ये सर्वाधिक ७.०२ टक्क्यावर पोहोचला होता. जिल्ह्यात यापूर्वी सर्वात कमी मृत्यू दर हा जूनमध्ये ३.०४ टक्के होता. जुलैमध्ये तो वाढत ४.०४ टक्क्यावर आला. ऑगस्टमध्ये घट होत ३.०५ टक्क्यावर आला. आता तो केवळ २. ५४ टक्क्यावर आला आहे.

चाचण्या अधिक तर बाधितांचे प्रमाणही जास्तच

जिल्ह्यात कोरना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यासाठी चाचण्यांचे वाढते प्रमाणही कारणीभूत होते. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. त्यात ६८ हजार ७९७ निगेटिव्ह रुग्ण आढळले. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही १६ हजार ८४१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२. ७० टक्क्यावर पोहोचले आहे. हेच प्रमाण ऑगस्टमध्ये ४४. ७२ टक्के इतके होते. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

येथे क्लिक करा नांदेड- सावधान दुखणे अंगावर काढू नका, उशीरा दाखल झालेल्या रुग्णांचा होतोय मृत्यू

मुबलक प्राणवायु महत्वाचा ठरला
कोरोना रुग्णांसाठी लागणारा महत्वाचा प्राणवायु जिल्ह्यात आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना कोरोनावर मात करता आली. जिल्हा प्रशासनाला वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब नसली तरी मृत्यू होऊ नये याची खबरदारी सुरुवातीपासूनच घेतली होती. जिल्हा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारलेली प्राणवायुची सुविधा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. यामुळेच कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश आले. त्याच वेळी गृहविलगीकरणालाही मुभा दिल्याने रुग्णांचा आत्मविश्वास वाढला. यातूनही मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली. एवढेच नाही तर नांदेडकरांनाही प्रशासनाला मदत केली. नांदेडकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन केल्यास कोरोनावर नक्कीच आपण मात करु असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
- डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for Nandedkar: Corona mortality rate has come down, but the crisis has not gone away nanded news